गुरांचा बाजार भरला, पण प्रतिसाद नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:23 AM2021-09-06T04:23:25+5:302021-09-06T04:23:25+5:30
कोरोनाच्या उद्रेकामुळे गुरांचा बाजार बंद करण्यात आला होता. दरम्यान, पशुपालकांकडून बाजार सुरू करण्याची मागणी होत होती; परंतु बाजारात होणारी ...
कोरोनाच्या उद्रेकामुळे गुरांचा बाजार बंद करण्यात आला होता. दरम्यान, पशुपालकांकडून बाजार सुरू करण्याची मागणी होत होती; परंतु बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता बंदी कायम ठेवण्यात आली. सध्या जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, रुग्णसंख्येतही घसरण झाली आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना बैल व इतर गुरांची गरज भासत आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध अटी व शर्तींसह बाजार सुरू करण्यात परवानगी दिली. अकोला महानगरपालिका क्षेत्रात भरणाऱ्या गुरांचे आठवडी बाजाराचे नियोजन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी करून त्यास महानगरपालिका आयुक्त यांच्या स्तरावरून सहकार्य करण्याचे आदेशित केले आहे. रविवारी शहरात गुरांचा बाजार भरला. या बाजारात सकाळी काही प्रमाणात गर्दी होती; परंतु काही तासांतच बाजार ओसरला. दिवसभर फक्त ८-१० म्हैस, गाय विक्रीसाठी आणल्याचे दिसून आले.
पोळ्यामुळे बैल विक्रीस आलेच नाही!
सोमवारचा पोळा असल्याने रविवारी गुरांच्या बाजारात बैल विक्रीस आले नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सकाळच्या सुमारास काही पशुपालकांनी बकऱ्या, म्हैस, गाय विक्रीस आणल्या होत्या.