राज्याबाहेरील जनावरांचा काफिला महाराष्ट्रात; दुष्काळात तेरावा महिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:12 PM2018-04-30T14:12:06+5:302018-04-30T14:12:06+5:30
अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
- विजय शिंदे
अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय सद्यस्थितीत असलेल्या जनावरांची तपासणी करून त्यांना मूळ प्रदेशात जाण्याकरिता प्रवृत्त करावे अन्यथा कठोर कारवाई करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात येत असल्याचे शासनाचे आदेश आहेत; परंतु महाराष्ट्रात इतर राज्यातील जनावरांच्या कळपांनी बेकादेशीरपणे शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांकरिता दुष्काळात तेरावा महिना ठरत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.
महाराष्ट्रात गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव जनावरे चराईकरिता येत आहेत. विशेष म्हणजे मध्यप्रदेश व गुजरातमधून प्रचलित प्रवेश मार्गाने येणाऱ्या जनावरांचे प्रमाण जास्त आहे. या जनावरांमुळे पाळीव जनावरे व अभयारण्याच्या क्षेत्रात असणाºया वन्य प्राण्यांमध्ये तोंडखुरी /पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत राज्यात परप्रांतामधून मोठ्या प्रमाणात जनावरे येत असल्याचे राज्य महामार्गासह इतर मार्गावर आढळून येत आहेत. शेतातील हंगामाची उलंगवाडी झाल्याने शेते चराईकरिता ही जनावरे आली आहेत. यावरून राज्यात प्रवेशावेळी कोणी कायदेशीर अटकाव केल्याचे दिसून येत नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी जनावरे आढळून येत आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यामागे जबाबदारी असलेल्या संबंधिताची मिलीभगत असल्याची शंका व्यक्त होत आहे. सध्या महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना मुबलक चारा नसल्याने शेतकरी जनावरे विकत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा परराज्यात चारा पाठविण्यावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत शासन आदेशाची पूर्तता होत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता दुष्काळात तेरावा महिना आला असल्याची गंभीर समस्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरत आहे.