कत्तलीसाठी मालवाहू वाहनातून जाणारे गोवंश पकडले
By admin | Published: July 31, 2015 01:40 AM2015-07-31T01:40:17+5:302015-07-31T01:40:17+5:30
वाहन जप्त, आरोपी गजाआड.
अकोला: कत्तलीसाठी तीन बैलांना नेणारे मालवाहू वाहन रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी रायली जिनजवळील अलंकार मार्केटजवळ पकडले. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. सुटका केलेले बैल कान्हेरी सरप येथील करुणा भूमी गोरक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. सिंधी कॅम्प परिसरातील मुल्लानी चौकात राहणारा एहफाज अहमद अब्दुल सत्तार (२८) हा युवक त्याच्या एमएच 0९ एल ४७८७ क्रमांकाच्या मालवाहू वाहनामध्ये तीन बैलांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहन पकडले. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्हय़ाची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन बैल जप्त केले. हेड कॉन्स्टेबल अशोक चाटी यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी एहफाजवर कलम ३११ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जप्त केलेले गोवंश कान्हेरी सरप येथील करुणा भूमी गोशाळेच्या ताब्यात दिले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी दर्शन जैन, विनीत शाह, विमल जैन, हिमांशू पारेख, अंकित जैन, नीलेश जैन उपस्थित होते.