मान्यता नसतानाही 'सीबीएसई' अभ्यासक्रम: एमराल्ड हाइट्स स्कूलची शिक्षणाधिकाऱ्यांकडून झाडाझडती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:19 AM2020-07-14T11:19:38+5:302020-07-14T11:20:02+5:30
प्राथमिक शिक्षण विभागाच्या चमूने सोमवारी दुपारी शाळेत जाऊन झाडाझडती घेतली.
अकोला : केशव नगरातील एमराल्ड हाइट्स स्कूलला सीबीएसईची मान्यता नसतानाही या ठिकाणी सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकविला जातो. पालकांना सातत्याने शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावल्या जातो. कोरोनामुळे शाळा बंद असली तरी पालकांना सीबीएसई अभ्यासक्रमाची पुस्तके, वह्या, गणवेश शाळेतून खरेदी करण्याचा आग्रह केला जातो. पालकांनी उद्धट वागणूक दिली जात असल्याने, अनेक पालकांनी शाळेबाबत पालकमंत्री बच्चू कडू व शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या चमूने सोमवारी दुपारी शाळेत जाऊन झाडाझडती घेतली.
एमराल्ड हाइट्स स्कूल येथे राज्य अभ्यासक्रम मंडळाच्या अभ्यासक्रमाची मान्यता असतानादेखील शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम शिकविला जातो. आॅनलाइन शिक्षणाचे वेळापत्रक दिले आहे; परंतु त्याचे पालन होत नाही. शाळेत पालक समिती स्थापन केल्याचे दाखविण्यात आले; परंतु प्रत्यक्षात पालक, शिक्षक समिती अस्तित्वात नसतानाही पालकांकडून शुल्क वसूल करण्यात येत आहे. तसेच शाळेतून पुस्तकांची विक्री करणे, पालकांना उद्धट वागणूक देणे, अपमानित करण्याचे प्रकार शाळा व्यवस्थापकडून होत होते. त्यामुळे त्रस्त पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली; परंतु शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. अखेर पालकांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी शाळेची चौकशी करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी रतनसिंग पवार, दिलीप तायडे, श्याम राऊत, संजय मोरे, विनोद मानकर यांनी सोमवारी दुपारी शाळेत जाऊन झाडाझडती घेतली असता, पालकांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे समोर आले. शाळेला राज्य अभ्यासक्रम मंडळाची मान्यता असतानाही सीबीएसई पॅटर्नची पुस्तके, गणवेश, वह्या, शाळेतून विक्री करण्याच्या बेकायदेशीर बाबी निर्दशनास आल्या आहेत. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा गुप्ता, भावना जोशी उपस्थित होत्या. एवढेच नाही तर सीबीएसईची खासगी प्रकाशनाची पुस्तके वापरली जात असल्याचे चमूला दिसून आली.