महापालिकेतील सीसी कॅमेरे बंद
By Admin | Published: December 8, 2015 02:20 AM2015-12-08T02:20:05+5:302015-12-08T02:20:05+5:30
घटनेनंतर आयुक्तांनी दिले तत्काळ सुरू करण्याचे आदेश.
अकोला: महापालिकेत काँग्रेस नगरसेवकाला मारहाण झाल्याची माहिती मिळताच आयुक्त अजय लहाने यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाची पाहणी केली. यावेळी सीसी कॅमेरे बंद असल्याचे पाहून विद्युत विभागाला धारेवर धरले तसेच पदाधिकार्यांच्या दालनासह मनपाच्या सर्व विभागांतील सीसी कॅमेरे तात्काळ सुरू करण्याचे आदेश सोमवारी जारी केले. घटनेच्या वेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कुर्हाड कोसळू शकते. विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या दालनात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल जब्बार यांना मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीने साथीदारांच्या मदतीने जब्बार यांना मारहाण केल्याने मनपा वतरुळात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आयुक्त अजय लहाने यांनी तडकाफडकी महापालिका गाठत विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाची पाहणी केली. दालनात तुटलेल्या खुच्र्यांंचा खच व रक्ताचे डाग पाहून आयुक्तांनी घटनेच्या वेळी दालनात हजर असलेल्या कर्मचार्यांची झाडाझडती घे तली. अज्ञात इसमांची संख्या आठ ते दहापेक्षा जास्त असल्याचे समजताच आयुक्तांनी उपस्थित सुरक्षा रक्षकांची चांगलीच कानउघाडणी केली. सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असतील, तर अज्ञात इसमांचा शोध घेण्याची सूचना यावेळी आयुक्त लहाने यांनी करताच, मनपातील सर्व कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली. संतप्त झालेल्या आयुक्तांनी पदाधिकार्यांच्या दालनासह मनपाच्या सर्व विभागांतील कॅमेरे तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल डोईफोडे यांना दिले.