सीसी कॅमेरे खरेदीवरून खडाजंगी!

By admin | Published: January 3, 2017 01:26 AM2017-01-03T01:26:47+5:302017-01-03T01:26:47+5:30

‘डीपीसी’ ची सभेत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या पठाणी वसुलीसह विविध मुद्यांवर चर्चा

Cc cameras cost shopping! | सीसी कॅमेरे खरेदीवरून खडाजंगी!

सीसी कॅमेरे खरेदीवरून खडाजंगी!

Next

अकोला, दि. २- नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीला विश्‍वासात घेतल्याशिवाय 'सीसी कॅमेरे' खरेदी, जनसुविधांसह रखडलेल्या विविध विकासकामांच्या मुद्यावर सोमवारी जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा चांगलीच गाजली. सीसी कॅमेरा खरेदी प्रकरण विधानसभेत पोहचले असून या संदर्भात चौकशी सुरू आहे. त्यामुळे हा मुद्दा उपस्थित होताच पालकमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर खासदार संजय धोत्रे यांनी नाराजी व्यक्त केली. तर मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या पठाणी वसुलीसह विविध मुद्यांवर या सभेत वादळी चर्चा झाली.
पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला प्रामुख्याने खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. बळीराम सिरस्कार, आ. प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर उपस्थित होते. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीला विश्‍वासात न घेता जिल्हा प्रशासनामार्फत कार्योत्तर मंजुरीच्या नावावर जिल्हा परिषदमार्फत सीसी कॅमेरे खरेदी करण्यात आली. या खरेदीतील अनियमिततेमुळे जिल्हय़ाची प्रतिमा मलीन झाली. यासंदर्भात पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण प्रशासनाच्या संगनमताने घडल्याचे सिद्ध झाल्याने, कंत्राटदाराला पैसे परत करण्याची बाब जिल्हय़ाच्या इतिहासात घडली. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता जिल्हाधिकार्‍यांनी कार्योत्तर मंजुरी देणे योग्य नसून, याबाबत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आ. रणधीर सावरकर आणि मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी सभेत केली. त्यानुषंगाने यासंदर्भात चौकशी सुरू असून, दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. या मुद्यावरील चर्चेत चौकशी कशी होते, आम्हाला माहीत असल्याचे सांगत खासदार संजय धोत्रे यांनी नाराजी व्यक्त केली. दलित वस्ती व दलितेतर आणि नगरोत्थान योजनेंतर्गत महानगरपालिकेला ३0 कोटी आणि जिल्हा परिषदेला ५0 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, लाखपुरी येथील प्राचीन शिवालयाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी आ. सावरकर यांनी केली तसेच लघू गटाने सुचविलेल्या कामांचा निधी खर्च झाला नसल्याच्या मुद्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सोमठाणासह अकोट तालुक्यातील पुलांच्या कामांचा निधी अद्याप खर्च झाला नसल्याचा मुद्दा आ. प्रकाश भारसाकळे व जिल्हा परिषद सदस्य ज्योत्स्ना बहाळे यांनी उपस्थित केला. त्यानुषंगाने निधी खर्च करून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून जिल्हय़ात पठाणी वसुलीसह विविध मुद्यांवर सभेत चर्चा करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक, संचालन जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्‍वर आंबेकर यांनी केले. या सभेला विविध विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Cc cameras cost shopping!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.