‘कोरोना’मुळे ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 11:34 AM2020-03-29T11:34:16+5:302020-03-29T11:34:21+5:30
कापूूस खरेदीही बंद करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अकोला : कोरोनाचा प्रभाव सर्वच क्षेत्रावर झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने आठ दिवसांपूर्वी कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोेपाठ भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ने कापूस खरेदी केंद्रे बंद केली आहेत. राज्यात यावर्षीची शासकीय हरभरा खरेदी केंद्रे सुरू केलीच नाहीत. तूर, सोयाबीन व इतर धान्य खरेदी अगोदरच बंद करण्यात आली आहे. आता कापूूस खरेदीही बंद करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
‘सीसीआय’ने राज्यात ८३ शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. आजमितीस ९३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, खरेदी केंद्र सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ घोषित केल्यानंतर ‘सीसीआय’नेदेखील कापूस खरेदी बंद केली आहे. तत्पूर्वी सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे सुरूच राहतील, असा निश्चय सीसीआयने केला होता.
पणन महासंघाने राज्यात ७४ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली होती. तसेच १२३ जिनिंग, प्रेसिंग फॅक्टरीत कापूस खरेदी करण्यात येत होता. पणन महासंघाने यावर्षी ५२ लाख ५९ हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे. यापोटी राज्यातील २ लाख ६५७ हजार शेतकऱ्यांना २ हजार ४८७.४५ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. ३०० कोटींच्यावर चुकारे थकले आहेत. हे चुकारे शेतकºयांना देण्यात येत असल्याची माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.
‘एपीएमसी’ बंद करण्यात आल्याने आम्हाला कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आतापर्यंत ८४ लाख क्विंटल कापूस राज्यातून खरेदी केला आहे. शेतकºयांना चुकारे करण्यात येत आहेत.
- डॉ. अल्लीराणी,
सीएमडी,
सीसीआय,
मुंबई.