मर्यादेपेक्षा जास्त कापसाचीही सीसीआय करणार खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:41+5:302021-01-08T04:55:41+5:30
अकोला- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सीसीआयने कापूस खरेदीसाठी एका दिवसात फक्त १५ हजार गाठी कापूस खरेदी करण्याचे ...
अकोला- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सीसीआयने कापूस खरेदीसाठी एका दिवसात फक्त १५ हजार गाठी कापूस खरेदी करण्याचे बंधन घातले हाेते. या बंधनाला मागे घेण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात सोमवारी सीसीआय कार्यालयात महाप्रबंधक यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर महाप्रबंधक यांनी शेतकऱ्यांकडे मर्यादेपेक्षा जास्त कापूस आला, तरी खरेदी करणार असल्याचे मान्य केले.
सीसीआयद्वारे अकोला कार्यालयाच्या क्षेत्रांतर्गत कापूस खरेदीसाठी अनेक केंद्रे आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी सीसीआयने या कापूस खरेदी केंद्रांवरून एका दिवसात फक्त १५ हजार गाठी कापूस खरेदी करण्याचे बंधन लागू केले. वास्तविक पाहता भरपूर प्रमाणात कापूस आवक असताना खरेदीवर बंधने ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. कारण, भाड्याने घेतलेल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर, ट्रॉली घेऊन कडाक्याच्या थंडीत कापूस विक्रीसाठी रात्रंदिवस थांबणे शक्य नाही. ही बाब पटवून देण्यासाठी शिवा मोहोड, माजी नगरसेवक पंकज गावंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी यांनी सोमवारी सीसीआय महाप्रबंधक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन दिले.
त्रस्त व संतप्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना आल्याआल्या कार्यालयाबाहेर हाकलण्याचा प्रयत्न करून अरेरावीची व मुजोरीची भाषा वापरणाऱ्या व शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या महाप्रबंधक यांना बेशरमचे झाड भेट म्हणून देण्यात आले. तसेच कार्यालयात कापूस टाकण्यात आला. आक्रमक कार्यकर्ते पाहून अखेर महाप्रबंधक चर्चेसाठी तयार झाले. या चर्चेत त्यांनी मर्यादेपेक्षा जास्त कापूस आला, तरी तो खरेदी केला जाईल, असे आश्वासन दिले.
या आंदाेलनात
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन बोनगिरे, करण दोड, गोपाल बंड, शुभम ठाकरे, हर्षल खडसे, राम म्हैसने, ज्ञानेश्वर ताले, पवन अवताडे, हर्षल ठाकरे, तुषार शिरसाठ, शिवम शेंडे, विकी लाखे, संकेत कऱ्हे, प्रथमेश देशमुख, राज काळे, श्याम शिंदे, अनिल इंगळे, नितीन इंगळे, राजू इंगळे, गोलू खंडारे आदी सहभागी झाले.