प्लाझ्मा दान करून केला पत्नीचा वाढदिवस साजरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:58 PM2020-09-23T17:58:25+5:302020-09-23T17:58:34+5:30
प्लाझ्मा दान करून पत्नीचा वाढदिवस साजरा केल्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच घटना असावी, असा दावा संघदास वानखडे यांनी केला.
अकोला : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर सगळीकडे नकारात्मक वातावरण असताना कोरोनाची बाधा झालेल्या एका शिक्षकाने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या प्लाझ्मा थेरपीसाठी स्वत:चा प्लाझ्मा रक्तघटक दान करून त्यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा केल्याची सकारात्मक बाब बुधवारी पुढे आली. संघदास व भारती वानखडे असे या दाम्पत्याचे नाव आहे.
मुर्तीजापूर तालुक्यातील खडका येथील शाळेत शिक्षक संघदास वानखडे व त्यांच्या पत्नी भारती यांना गत महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. या दाम्पत्याने कोरोनाशी यशस्वी लढा दिल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचे ठरविले होते. परंतु प्लाझ्मा दान करणे धोकादायक आहे, असे काहींनी सांगितल्यामुळे संघदास वानखडे हे द्विधा मन:स्थितीत होते. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे डॉ. श्रीराम चोपडे यांच्याशी संपर्क साधून प्लाझ्मा दान करण्याचा मनोदय व्यक्त केला. परंतु, कोरोनातून बरे होऊन २८ दिवस होणे गरजेचे असल्याने त्यावेळी त्यांनी नकार दिला. दरम्यानच्या काळात संघदास वानखडे हे रक्तपेढीच्या संपर्कात होते. शेवटी २३ सप्टेंबर या त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाला प्लाझ्मा दान करण्याचे निश्चित झाले. त्यानूसार बुधवारी सकाळीच वानखडे दाम्पत्य सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत आले. तेथे आवश्यक सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांचा प्लाझ्मा घेण्यात आला. श्रीराम चोपडे (रक्तपेढी प्रमुख), तपस्या भारती (रक्तसंक्रमण अधिकारी प्रमुख), आशिष शिंदे (सहाय्यक प्राध्यापक), हेमंत मातुरकर (रक्तपेढी तंत्रज्ञ), अंकुश जमदाडे (कर्मचारी) यांचे सहकार्य मिळाले. प्लाझ्मा दान करून पत्नीचा वाढदिवस साजरा केल्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच घटना असावी, असा दावा संघदास वानखडे यांनी केला.