जागतिक वसुंधरा दिनी उल्का वर्षावाची पर्वणी
By Atul.jaiswal | Published: April 20, 2024 02:35 PM2024-04-20T14:35:03+5:302024-04-20T14:35:33+5:30
स्वरमंडळ तारका समूहातून होणार हा उल्का वर्षाव पूर्व आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.
अकोला : आकाशात सूर्य विषुववृत्ताकडून कर्कवृत्ताकडे सरकताना तापमानाचे नवनवे उच्चांक गाठत आहे. रणरणत्या उन्हाचा ताप कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी ग्रह-तारे आपल्या सोबतीला येऊन काहीसा दिलासा देतात. अशाच प्रकारचा विविधरंगी प्रकाश उत्सव अर्थात उल्का वर्षाव २१ व २२ एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनी होणार आहे. स्वरमंडळ तारका समूहातून होणार हा उल्का वर्षाव पूर्व आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.
उल्का स्वरूपात तूटणाऱ्या ताऱ्यांचा हा प्रकाश नजारा दरताशी सुमारे २० या प्रमाणात रात्री ११ नंतर पूर्व क्षितिजावर सुरू होऊन पहाटे आकाश मध्याशी असताना त्यांचा वेग वाढलेला असेल. पश्चिमेस चंद्रास्त झाल्याने या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल. नेहमी रात्रीच्या वेळी उत्तर दिशा दर्शविणारा ध्रुव तारा हा आपण अढळ मानत असलो तरी सुमारे २६,००० वर्षात वेगवेगळ्या वेळी बदलणारे ध्रुवतारे उत्तर आकाशात पाहता येतात.
हा अनोखा प्रकाश नजारा स्वरमंडळ ( LYRA) तारका समूहातील अभिजित तारा (VEGA) सुमारे १२,००० वर्षानी होणारा ध्रुवतारा आपणास बघता येईल, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.