‘सबका मंगल हो’च्या जयघोषात तथागताला वंदन; अकोल्यात भगवान बुद्ध यांची जयंती साजरी
By संतोष येलकर | Published: May 5, 2023 07:20 PM2023-05-05T19:20:08+5:302023-05-05T19:48:36+5:30
तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमा, शुक्रवार ५ मे रोजी जिल्ह्यात मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली.
अकोला : तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमा, शुक्रवार ५ मे रोजी जिल्ह्यात मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. भगवान बुद्ध यांनी दिलेला शांतीचा संदेश, मैत्रीभावनेची जोपासना आणि ‘सब का मंगल हो’च्या जयघोषात सामूहिक त्रिशरण पंचशील व सूत्रपठण ग्रहण करीत तथागत बुद्ध यांना वंदन करण्यात आले.
भगवंताला वंदन करण्यासाठी अकोला शहरातील अशोकवाटिकेत अनुयायांची गर्दी उसळली होती. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरासह जिल्ह्यातील गावागावांतील बुद्धविहारांमध्ये आयोजित कार्यक्रमांत तथागत बुद्ध यांच्या प्रतिमा व पुतळ्यासमोर दीपप्रज्वलन आणि पुष्प अर्पण करीत सामूहिक त्रिशरण पंचशील, बुद्धपूजा, बुद्धवंदना, आशीर्वाद गाथा असे सूत्रपठण ग्रहण करण्यात आले. त्यामध्ये ‘सर्वांचे मंगल हो’ अशी मंगल कामना करीत तथागताला वंदन करण्यात आले.
तसेच विविध ठिकाणी आयोजित प्रवचन आणि व्याख्यानांच्या कार्यक्रमांत तथागत बुद्ध यांचे जीवन, त्यांनी दिलेला संदेश व समृद्ध जीवन जगण्यासाठी बुद्धविचार आत्मसात करण्याची आवश्यकता, आदी मुद्द्यांवर मंथन करण्यात आले. तथागत बुद्ध यांना वंदन करण्यासाठी अकोला शहरातील अशोकवाटिकेत सकाळपासूनच बौद्ध उपासक, उपासिका आणि अनुयायांची गर्दी उसळली होती. वाटिकेतील भगवान बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून व पुष्प अर्पण करून तथागताला वंदन करण्यात आले.