रद्दी संकलन व लोकसहभागातून केली वंचितांची दिवाळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 06:51 PM2017-10-20T18:51:32+5:302017-10-20T18:53:31+5:30
अकोल्यातील एक ध्येयवेड्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संकलित रद्दीच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम व लोकसहभागातून वंचितांची दिवाळी गोड केली.
अकोला : ‘फाटले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती’ या काव्यपंक्तीप्रमाणे वंचितांची दिवाळी साजरी व्हावी, या हेतूने गत ११ वर्षांपासून झटत असलेल्या अकोल्यातील एक ध्येयवेड्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संकलित रद्दीच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम व लोकसहभागातून वंचितांची दिवाळी गोड केली.
दिवाळी म्हटली, की आनंद, उस्ताह. हा आनंद प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करीत असतो. मात्र, आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्यासाठी धडपडणारे ध्येयवेडे फारच थोडे. दिवाळीत संपूर्ण देश एका वेगळ्या आनंदात असताना समाजातील एक घटक मात्र या सर्व उत्साह, आनंदापासून कोसो दूर असतो.
अशाच वंचितांच्या जीवनात आनंद, उत्साह भरण्याचा प्रयत्न ‘स्वराज’ या संस्थेच्या माध्यमातून शिंदे करीत आहेत. नागरिकांकडून रद्दी गोळा करीत त्यातून मिळणाºया पैशातून वंचितांना दिवाळीत फराळ, कपडे देऊन त्यांच्या आयुष्यातही एका दिवसात दिवाळीच्या आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न शिंदे करीत आहेत. यावर्षीही शिंदे यांनी सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जठारपेठ चौक, संत गजानन महाराज मंदिर अशा विविध ठिकाणी वंचित व गरजू लोकांना नवीन कपडे व दिवाळीच्या फराळाचे वितरण स्वहस्ते केले. या उपक्रमाअंतर्गत शिंदे यांच्या ‘स्वराज’ संघटनेने तब्बल २५० मुला-मुलींना नवीन कपडे, ९० महिलांना साड्यांचे वितरण केले. तसेच ३० जोडी धोतर व ३० नववारी लुगड्यांचेही वितरण करण्यात आले. या वंचितांना स्वराज संघटनेने दिवाळीचा फराळ देऊन त्यांचे तोंडही गोड केले.
अकोलेकरांचा भरभरुन प्रतिसाद
घरात पडून राहत असलेली रद्दी विकून त्यातून कोणाची दिवाळी साजरी होत असेल, तर यापेक्षा दुसरे पुण्य कर्म नाही. यासाठी पुरुषोत्तम शिंदे यांनी रद्दी संकलन करण्याचे आवाहन केले होते. अकोलेकरांनी या आवाहनला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रद्दी ‘स्वराज’ संस्थेकडे जमा केली. या रद्दीच्या विक्रीतून आलेली रक्कम तसेच काही सहृदयी नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन केलेली मदत यातून ‘स्वराज’ संघटनेने वंचितांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.
‘प्रभात’च्या मुलांनीही उचलला वाटा
पुरुषोत्तम शिंदे यांनी केलेल्या रद्दी संकलनाच्या आवाहनास प्रतिसाद देताना प्रभात किड्स स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ८०० किलो रद्दी गोळा केली. ही सर्व रद्दी शाळेकडून ‘स्वराज’ संघटनेला देण्यात आली. यामधून अनेकांची दिवाळी साजरी होण्यात मदत झाली.