अकोल्यात संत जलाराम जयंतीचे आयोजन, शहरातून निघणार शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:26 PM2017-10-24T16:26:19+5:302017-10-24T16:27:11+5:30
अकोला: हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत जलाराम बाप्पा यांच्या २१८ व्या जयंतीचे आयोजन शुक्रवार २७ आॅक्टोबर करण्यात आले आहे. या पर्वावर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानीय बिर्ला कॉलनी परिसरातील जलाराम बाप्पा मंदिरात शुक्रवार दि .२७ आॅक्टो रोजी हा जन्म जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिनी सकाळी ७ वा.जयंती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे समाजसेवी रसिक कारिया, नरेंद्र गणात्रा, संजय ठाकणार यांच्या हस्ते बाप्पा यांची प्रतिमा पूजन, अभिषेक व ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी ११ वा. मंदिर परिसरात छपन्न भोग दर्शन कार्यक्रम होणार असून, दु.१२ वा. ब्रिजमोहन चितलांगे, समाजसेवी भाईलाल पोपट, भाईलाल जीवाणी, सुधाबेन उनडकाट यांच्या हस्ते महाप्रसादास प्रारंभ होणार असल्याची माहिती मंदिर प्रमुख नंदकिशोर द्रोण यांनी या संदर्भात मंदिर परिसरात झालेल्या बैठकीत दिली.
जयंती दिनी दुपारी लोहाणा महिला मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात भव्य रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.रात्री ९ वा. कार्यक्रमाचे मुख्य यजमान मुंबई येथील प्रवीण ठक्कर, राहुल शाह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्या निघणार शोभायात्रा
जयंती पर्वाच्या पूर्व संध्येवर गुरुवार, २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. स्थानीय रतनलाल प्लॉट परिसरातील रघुवंशी मंगल कार्यालय येथून संत जलाराम यांची भव्य शोभायात्रा निघणार आहे. समाजसेवी जयंतीलाल सायानी, नितेश बरालिया, किशोरकुमार रुपारेल आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. ही शोभायात्रा जलाराम बाप्पा यांच्या मनोहारी देखाव्यासोबत दुर्गा चौक परिसरातून जलाराम मंदिर येथे पोहचणार आहे. या जयंती सोहळ्यात समस्त महिला-पुरुष व बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लोहाणा महाजन सभा, जलाराम भजन मंडळ, लोहाणा महिला मंडळ , युवक मंडळ, हरी सेवा समिती व जलाराम मंदिर कार्यकर्त्यांंच्या वतीने करण्यात आले आहे.