सिमेंट रस्त्यात घोळ; कारवाईसाठी भाजपाला मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:11 PM2018-11-14T13:11:38+5:302018-11-14T13:12:01+5:30

अकोला: शहरातील सिमेंट रस्त्यांची वाट लावणाºया महापालिकेच्या अधिकारी-अभियंत्यांसह दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्याचा छातीठोकपणे दावा करणाºया महापौर विजय अग्रवाल यांना अद्यापही विशेष सभेचा मुहूर्त सापडला नसल्याचे चित्र आहे.

Cement road scam; BJP can not find Muhurat for action! | सिमेंट रस्त्यात घोळ; कारवाईसाठी भाजपाला मुहूर्त सापडेना!

सिमेंट रस्त्यात घोळ; कारवाईसाठी भाजपाला मुहूर्त सापडेना!

googlenewsNext

अकोला: शहरातील सिमेंट रस्त्यांची वाट लावणाºया महापालिकेच्या अधिकारी-अभियंत्यांसह दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्याचा छातीठोकपणे दावा करणाºया महापौर विजय अग्रवाल यांना अद्यापही विशेष सभेचा मुहूर्त सापडला नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे सिमेंट रस्त्यात घोळ करणाºयांविरोधात थेट पोलीस तक्रार करणार असल्याचे शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, मनपा गटनेते राजेश मिश्रा, शहर प्रमुख अतुल पवनीकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. या गंभीर प्रकरणी दोषींवर कारवाई होणे अपेक्षित असताना भाजप-शिवसेनेचा बार फुसका ठरला असून, महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने साधलेली चुप्पी संशयाच्या भोवºयात सापडली आहे.
मनपा प्रशासनाने शहरातील मुख्य सहा सिमेंटच्या रस्त्यांची निविदा प्रकाशित केली होती. स्थानिक ‘आरआरसी’ कंपनीने १२ टक्के जादा दराने सादर केलेली निविदा प्रशासनाने मंजूर केली. यामध्ये मुख्य पोस्ट आॅफिस ते सिव्हिल लाइन चौक, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, माळीपुरा ते मोहता मिल, अशोक वाटिका ते सार्वजनिक बांधकाम विभागपर्यंत आदी रस्त्यांचा समावेश होता. सदर रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिगळ लावण्याची वेळ कंत्राटदारावर आली. यादरम्यान, नेहरू पार्क चौक ते महापारेषण कार्यालय तसेच सरकारी बगिचा ते सार्वजनिक बांधकाम विभागपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट रस्त्यांचे निर्माण केले. शहरात तयार करण्यात आलेले सिमेंट रस्ते अत्यंत दर्जाहीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ जुलै २०१८ रोजी सहा रस्ते कामांचा सोशल आॅडिट करण्याचा आदेश दिला. त्यानुसार अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रयोगशाळा इत्यादी तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे सोशल आॅडिट करण्यात आले असता, रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे अहवालात आढळून आले.

शिवसेनेची वल्गना; काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
सिमेंट रस्ते प्रकरणी दोषी अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी तक्रार करणार असल्याची शिवसेनेची डरक ाळी हवेत विरली आहे. मनपात विरोधी पक्ष असणाºया काँग्रेसची सोयीस्कर भूमिका पाहता पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागण्याची वेळ आली आहे. सिमेंट रस्ते प्रकरणात काँग्रेसने निवेदन देऊन औपचारिकता पूर्ण केल्यामुळे महापालिकेत काँग्रेसचा ‘हात’ नेमका कोणासोबत, असा प्रश्न अकोलेकर उपस्थित करीत आहेत.


सिमेंट रस्ते भाजपच्या अंगलट
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सिमेंट रस्ते कामांचा अहवाल जाहीर केल्यानंतर मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने दोषींवर कारवाई करणे अपेक्षित होते. या मुद्यावर दोन्ही प्रशासकीय यंत्रणांनी मूग गिळल्याचे चित्र आहे. याप्रकरणी भाजपची बदनामी होत असताना सत्ताधाºयांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

 

Web Title: Cement road scam; BJP can not find Muhurat for action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.