अकोला जिल्ह्यात १ मे पासून सुरू होणार जनगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:26 AM2020-03-04T11:26:34+5:302020-03-04T11:27:07+5:30
जनगणनेच्या कामासाठी प्रभारी अधिकारी म्हणून तहसीलदार व नगरपालिकांच्या मुख्याधिकाºयांची (सीओ) नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला : जिल्ह्यात येत्या १ मेपासून जनगणनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गावनिहाय नकाशे व प्रगणक गट तयार करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील तहसीलदार व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.
येत्या १ मेपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यांत जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यानुषंगाने निवासी उपजिल्हाधिकाºयांनी मंगळवार, ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील तहसीलदार, महानगरपालिका व नगरपालिकांच्या अधिकाºयांची बैठक घेतली. जनगणनेच्या कामासाठी गावनिहाय नकाशे, घरांच्या याद्या, प्रगणक गट तयार करून जनगणेच्या कामासाठी कर्मचाºयांच्या नियुक्त्या आणि नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. या बैठकीला जिल्ह्यातील सातही तहसीलदार, नगरापालिकांचे मुख्याधिकारी व मनपा उपायुक्तांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रभारी अधिकारी म्हणून तहसीलदार, सीओंची नियुक्ती!
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार जनगणनेच्या कामासाठी प्रभारी अधिकारी म्हणून जिल्ह्यातील सातही तहसीलदार व नगरपालिकांच्या मुख्याधिकाºयांची (सीओ) नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.