केंद्रनिहाय मतदानाचा अहवाल मागविला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:38 PM2019-05-27T12:38:44+5:302019-05-27T12:38:51+5:30
मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रनिहाय अहवाल मागविण्यात आला आहे.
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (ईव्हीएम) घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये फरक आहे काय, यासंदर्भात मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रनिहाय अहवाल मागविण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश खवले यांनी रविवारी यांनी दिली.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गत १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले असून, २३ मे रोजी मतमोजणी झाली आहे. मतदान प्रक्रियेत ‘ईव्हीएम’द्वारे ११ लाख १६ हजार ७६३ मतदान झाले होते. तसेच टपाली मतपत्रिकांद्वारे ३ हजार २८३ मतदान झाले. त्यानुसार एकूण ११ लाख २० हजार ४६ मतदान झाले असले तरी मतमोजणी प्रक्रियेत ११ लाख २० हजार १८५ मतांची मोजणी करण्यात आली. त्यानुषंगाने मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रांवरील ईव्हीएमद्वारे मतदानाची मतदान केंद्राध्यक्षांकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये फरक आहे काय, यासंदर्भात मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीचा अहवाल मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून मागविण्यात आला आहे. अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांना देण्यात आल्या, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.