राज्याला कोविड लस देण्यात केंद्राचा दुजाभाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:18 AM2021-04-11T04:18:51+5:302021-04-11T04:18:51+5:30
अकोला : केंद्र सरकार राज्य सरकारला कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यामध्ये दुजाभाव करीत असल्याचा आरोप जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी शनिवारी ...
अकोला : केंद्र सरकार राज्य सरकारला कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यामध्ये दुजाभाव करीत असल्याचा आरोप जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी शनिवारी शहरातील स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस पक्षाच्यावतीने अकोला शहरातील स्वराज्य भवन येथे कोविड साहाय्य व मदत केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरणासाठी आवश्यक असलेली कोविड लस राज्य सरकारला देण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, लसीकरणासाठी राज्याला आवश्यक असलेला कोविड लसचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत नाही. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी कोविड लसीकरण बंद पडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला कोविड लस देण्यामध्ये दुजाभाव करणाऱ्या केंद्र सरकारच्या भूमिकेचा काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करण्यात येत असल्याचे काँग्रेसचे अकोला महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी यांनी सांगितले. कोविड रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय साहाय्यता उपलब्ध करून देण्यासाठी शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अकोला शहरातील स्वराज्य भवन येथे कोविड साहाय्य व मदत केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी पक्षाच्यावतीने जिल्हा टास्क पथक गठीत करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जावणत आहे. त्यानुषंगाने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वराज्य भवन येेथे रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याचेही बबनराव चौधरी यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, हेमंत देशमुख, मदन भरगड, प्रा. संजय बोडखे, अविनाश देशमुख, राजेश भारती, डाॅ. सुभाषचंद्र कोरपे, प्रशांत गावंडे, प्रदीप वखारिया, कपिल रावदेव, तश्वर पटेल आदी उपस्थित होते.