सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकास ठोकल्या बेड्या

By admin | Published: December 14, 2015 02:39 AM2015-12-14T02:39:23+5:302015-12-14T02:39:23+5:30

२९ लाख रुपयांची अफरातफर भोवली.

Central Bank of India man | सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकास ठोकल्या बेड्या

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकास ठोकल्या बेड्या

Next

अकोला: महात्मा फुले मागासवर्गीय विकास मंडळाकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणातील रक्कम बेरोजगारांच्या खात्यात जमा करताना सुमारे २९ लाख रुपयांच्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बँक व्यवस्थापकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रकाशचंद्र छोटुलाल अग्रवाल असे आरोपीचे नाव असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास मंडळाकडून बेरोजगार युवकांची मे २0१४ मध्ये कर्ज प्रकरणं मंजूर करण्यात आली होती. त्यांच्या कर्जाची रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रामदासपेठ शाखेतील संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक प्रकाशचंद्र अग्रवाल याने बेरोजगारांच्या कर्ज रकमेतील तब्बल २९ लाख रुपयांच्या रकमेत अफरातफर करीत ती रक्कम स्वत:च्या खात्यात वळती केली होती. मात्र, काही दिवसातच बँकेचे अंकेक्षण करताना बेरोजगारांना करण्यात आलेल्या कर्जाच्या वितरणातील २९ लाख रुपयांच्या रकमेमध्ये घोळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे बँकेचे सनदी लेखापाल यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बँक व्यवस्थापक प्रकाशचंद्र अग्रवाल रा. न्यू तापडियानगर याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४७१, ४६८, ४0९ नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच बँक व्यवस्थापक अग्रवाल फरार झाला. गत एक वर्षांंपासून तो फरार असताना त्याला रामदासपेठ पोलिसांनी न्यू तापडियानगरमधून अटक केली. अग्रवाल याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Central Bank of India man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.