केंद्र सरकार औटघटकेचं; तुम्ही कामाला लागा! उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन
By आशीष गावंडे | Updated: June 20, 2024 22:39 IST2024-06-20T22:39:10+5:302024-06-20T22:39:24+5:30
लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकाेल्यात दाखल झाले हाेते.

केंद्र सरकार औटघटकेचं; तुम्ही कामाला लागा! उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन
अकाेला: लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने भाजपला जमिनीवर आणले आहे. २८ जागांवर लढणाऱ्या भाजपला अवघ्या नऊ जागांवर गुंडाळून ठेवले. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असलेली चीड मतांमध्ये रूपांतरित केली. परिणामी मोदी सरकारला सत्ता स्थापन करताना नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली. या दाेन्ही नेत्यांचा पूर्वइतिहास तपासल्यास ते कधी पलटी मारतील,याचा भरवसा नसल्यामुळे केंद्र सरकार औटघटकेचं असून तुम्ही विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन उध्दवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना केले.
लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकाेल्यात दाखल झाले हाेते. आढावा बैठकीनंतर पदाधिकारी व शिवसैनिकांना खा.सावंत यांनी मार्गदर्शन केले. आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच विधानसभा निवडणूक लढणार आहाेत. पुढील तीन महिन्यांनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन हाेणार असल्याने तुम्ही जाेमाने कामाला लागा,असे आवाहन खा.सावंत यांनी केले. यावेळी मंचावर जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, वाशिम संपर्क प्रमुख दिलीप जाधव, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, प्रा.नरेंद्र खेडेकर,माजी आ.संजय गावंडे, हरिदास भदे, अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, राहुल कराळे आदींची उपस्थिती होती.
हाेय, मुस्लिमांनी मते दिली!
जनतेने भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडीला काैल दिल्याचे सांगत खा.अरविंद सावंत यांनी आघाडी व सेनेच्या उमेदवारांना मुस्लिमांनी मतदान केल्याचे स्पष्ट केले. हे आम्ही कधीच नाकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणीवर भर
भाजपला हद्दपार करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांनी झटले पाहिजे. यासाठी पुढील दिवसांत संघटन बांधणीवर भर देणार असल्याचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा लढणार असल्याचा निर्धार आ.देशमुख यांनी व्यक्त केला.