मध्य रेल्वेने केली २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 03:49 PM2020-08-31T15:49:52+5:302020-08-31T15:50:00+5:30
मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १५० दिवसांत ऊर्जा, उद्योग व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करीत, २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.
अकोला : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली, तरी या काळात ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वस्तू व माल वेळेवर पोहोचविण्यासाठी मालगाड्या सुरू आहेत. मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १५० दिवसांत ऊर्जा, उद्योग व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करीत, २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.
देशांतर्गत मालवाहतुकीसाठी रेल्वेचा सर्वाधिक वापर होतो. अवजड उद्योग, कृषीपूरक साहित्य, ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रातील मालवाहतुकीसाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय आहे. देशभरात लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरितांना ने-आण करण्यासाठी काही गाड्या वगळता रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंदच आहे. या काळात रेल्वेने मालवाहतूक मात्र पूर्ण क्षमतेने चालू ठेवली. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून २३ मार्च २०२० ते अनलॉक-३ च्या १९ आॅगस्ट २०२० या १५० दिवसांच्या कालावधीत मध्य रेल्वेने ८,०२५ मालगाड्यांमधून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड आणि स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची वाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी २,५५८ वाघिणी मालाची वाहतूक केली. वाघिणी भारांच्या बाबतीत ३,८३,१८९ वाघिणींमध्ये २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली.
अशी केली वाहतूक
मध्य रेल्वेने अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी १,४५,३१५ कोळशाच्या वाघिणींचा पुरवठा विविध ऊर्जा प्रकल्पांना केला. तसेच ४,२४८ वाघिणींमधून अन्नधान्य आणि साखर; शेतकऱ्यांच्या हितासाठी १७,५३६ वाघिणी खते आणि ५,३०५ कांदा; पेट्रोलियम पदार्थांच्या ३७,८४० वाघिणी, लोह आणि स्टीलच्या ९,९०९ वाघिणी, सिमेंटच्या २५,११२ वाघिणी, १,१८,८२६ कंटेनर वाघिणी आणि सुमारे १९,०९८ वाघिणी डी-आॅइल केक व इतर वस्तूंची वाहतूक केली.