केंद्रीय पथक आज बोरगाव मंजू, मूर्तिजापूरमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:17 AM2021-04-13T04:17:43+5:302021-04-13T04:17:43+5:30
अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रविवारपासून जिल्हा दौऱ्यावर आलेले केंद्रीय ...
अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रविवारपासून जिल्हा दौऱ्यावर आलेले केंद्रीय पथक मंगळवारी जिल्ह्यातील बोरगावमंजू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपाययोजनांची पाहणी करणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यूचे वाढते प्रमाण यासह कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी व्दिसदस्यीय केंद्रीय पथक ११ एप्रिलपासून अकोला जिल्हा दौऱ्यावर आले आहे. १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील बोरगावमंजू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे केंद्रीय पथक भेट देणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, मृत्यूचे प्रमाण यासंदर्भात केंद्रीय पथकाकडून माहिती घेण्यात येणार आहे. तसेच दोन्ही ठिकाणी कन्टेन्मेंट झोनची (प्रतिबंधित क्षेत्र) पाहणीदेखील केंद्रीय पथकाकडून घेण्यात येणार आहे, असे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी सांगितले.