केंद्रीय पथकाने घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 06:02 PM2021-04-11T18:02:09+5:302021-04-11T18:02:16+5:30
Corona situation of Akola : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आले.
जिल्ह्यातील कोविड संसर्गाच्या सद्यस्थितीचा व त्यावर जिल्हा प्रशासनामार्फत होत असलेल्या उपाययोजनांचा आज केंद्रीय पथकाने आढावा घेतला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आज केंद्रीय पथक दाखल झाले. डॉ. मनिष चतुर्वेदी व डॉ. महेशबाबू या दोन तज्ज्ञ सदस्यांच्या या पथकाने जिल्ह्यातील कोविड सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त व्ही.डी. सुलोचने, निरीक्षक संजय राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. श्याम शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील कोविड सद्यस्थिती व त्याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेले उपाययोजना याबाबत सादरीकरण केले. यावेळी पथकातील दोन्ही तज्ज्ञांनी कोविड चाचण्या, त्यानंतर पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांवर केले जाणारे वैद्यकीय उपचार, उपचार करतांना पालन केलेल्या बाबी याबाबत माहिती जाणून घेतली. आताच्या कोविड उद्रेकात कोविड रुग्णांच्या वाढत्या मृत्यू दराबाबत पथकातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. याबाबतही त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्सकडून अधिक माहिती जाणून घेतली.
जिल्ह्यातील लोकांना होणारा संसर्ग ते रुग्ण संसर्गाच्या विविध पातळीवर पोहोचण्याचा कालावधी, या कालावधीत त्याचेवर झालेल्या उपचाराची माहिती, तसेच रुग्णाच्या सहव्याधींबाबतची स्थिती या विषयांवर त्यांनी चर्चा केली. संसर्ग झाल्यापासून ते रुग्ण अत्यवस्थ होण्याचा कालावधी कमी होत आहे, असे निरीक्षण मांडण्यात आले. त्यामुळे रुग्णांनी चाचणी करुन तात्काळ रुग्णालयात दाखल होणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे व त्यानुसार उपचार घेणे याबाबत शासकीय, खाजगी डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा व प्रत्यक्ष लोकांमध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे जनजागृती करण्याची आवश्यकता आहे,असे मत त्यांनी मांडले. तसेच जिल्ह्यात आवश्यक उपचार सुविधा, औषधे व चाचण्यांची सुविधा तसेच ऑक्सिजन उपलब्धता याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच लसीकरणाच्या मोहिमेबाबतही माहिती घेतली.
जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या दोन दिवस हे पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करुन माहिती घेणार आहे.