म्हशी खरेदीसाठी आयुक्तांसह ‘सीईओ’ बाजारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:26 PM2019-09-07T12:26:07+5:302019-09-07T12:26:34+5:30
लाभार्थींसोबतच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद बडनेरा येथील बाजारात पोहोचले.
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दूधपूर्णा योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद, अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह शुक्रवारी बडनेरा येथील बाजारात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत लाभार्थींसाठी बाजारात २२ म्हशी खरेदी करण्यात आल्या.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दूधपूर्णा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींना म्हशी खरेदीसाठी प्रत्येकी ४२ हजार ५०० रुपयांप्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढावे, लाभार्थींना चांगल्या दर्जाच्या म्हशी मिळाव्या आणि म्हशींच्या खरेदीत अनियमितता होऊ नये, यासाठी जिल्ह्याबाहेरील बाजारातून म्हशींची खरेदी करण्यात येत आहे. त्यानुषंगाने ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील २२ लाभार्थी म्हशी खरेदीसाठी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील बाजारात पोहोचले. लाभार्थींसोबतच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद बडनेरा येथील बाजारात पोहोचले. त्यांच्या विनंतीनुसार विभागीय आयुक्त पीयूष सिंह बडनेरा येथील बाजारात पोहोचले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिश्रा व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २१ लाभार्थींसाठी २१ म्हशी खरेदी करण्यात आल्या. तसेच एका लाभार्थीने स्वत:च्या पैशाने म्हैस खरेदी केली.
विभागीय आयुक्तांनी व्यक्त केले समाधान!
अकोला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दूधपूर्णा योजनेंतर्गत जिल्ह्याबाहेरील चांगल्या म्हशी खरेदी करण्यात येत असून, लाभार्थींसोबतच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत म्हशींची खरेदी करण्यात येत असल्याने, विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी लाभार्थींसोबत चर्चा करून दूध व्यवसायासाठी सदिच्छा दिल्या.