हिवरखेड येथील वादग्रस्त ग्रामसभेच्या चौकशीचे सीईओंचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:08+5:302021-09-03T04:20:08+5:30
हिवरखेड ग्रामपंचायतची २१ ऑगस्ट रोजी गैरकायदेशीररीत्या दाखविण्यात आलेली ग्रामसभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील इंगळे ...
हिवरखेड ग्रामपंचायतची २१ ऑगस्ट रोजी गैरकायदेशीररीत्या दाखविण्यात आलेली ग्रामसभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील इंगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, जि. प. अकोला, गटविकास अधिकारी तेल्हारा यांच्याकडे केली होती. त्यांच्या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले होते. विशेषकरून वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा न करता व कोणत्याच विषयावर मतदान न घेता सरपंच, सचिव सभेचे कामकाज पुस्तिका घेऊन सभागृहाबाहेर निघून गेले होते. सचिवांना विचारणा केली असता, सचिव यांनी ८९ सह्या झाल्यामुळे कोरम पूर्ण झाला नाही, त्यामुळे सभा तहकूब झाल्याचे सांगितले. ग्रामपंचायत सदस्य सुनील इंगळे यांनी पुन्हा ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, गोंधळ झाल्यामुळे थोड्यावेळाने सभा घेण्यात आली असे सांगितले. परंतु, ती सभा तहकूब झाल्यावर पुन्हा घेण्यात आलीच नाही, या सभेत वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा व प्रत्यक्ष मतदान झालेच नाही, असे विविध आरोप तक्रारीतून करण्यात आले होते. एकंदरीत ती वादग्रस्त ग्रामसभा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशावरून गटविकास अधिकाऱ्यांनी सदर चौकशी करण्याचे आदेश विस्तार अधिकारी पंचायत यांना दिले असल्याची माहिती मिळाली आहे. आता विस्तार अधिकारी यांच्या चौकशीचा निष्कर्ष काय निघतो याकडे हिवरखेडवासीयांचे लक्ष लागले आहे.
दुपारी दोन वाजताच्या दरम्यान सचिवांना मी फोन केला असता, त्यांनी मला ८९ सह्या झाल्यामुळे व सभेत गोंधळ झाल्यामुळे ग्रामसभा तहकूब झाल्याची माहिती दिली. त्यामुळे ही वादग्रस्त ग्रामसभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
-सुनील इंगळे, ग्रामपंचायत सदस्य