राष्ट्रसंताच्या भजनांवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:02+5:302021-09-03T04:20:02+5:30
अकाेला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या भजनावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथील सीताबाई कला महाविद्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आला ...
अकाेला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या भजनावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथील सीताबाई कला महाविद्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. काेराेनाच्या संकटामुळे हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ऑनलाइन पूर्ण केला जाणार असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील एकमेव अभ्यासक्रम आहे.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांनी ग्रामगीता व भजनांद्वारे प्रबाेधनाची माेठी गाथा समाजाला दिली आहे. नव्या पिढीला या गाथेची ज्ञान व्हावे व राष्ट्रसंतांचे विचार त्यांनी आत्मसात करावे, याकरिता सदर अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. वर्षभरात तीस दिवसांच्या दाेन तुकड्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार असून, परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात राहणार आहे. आभासी पद्धतीने राष्ट्रसंताचे विचार तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांपर्यंत पाेहोचविणार असल्याचे या अभ्यासक्रमाचे समन्वयक डाॅ. उमेश चापके यांनी सांगितले.
नव्या पिढीला राष्ट्रसंतांच्या विचाराचा ठेवा कळावा, याकरिता हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. वर्ग ११ वीनंतर काेणालाही यासाठी निशुल्क प्रवेश आहे.
डाॅ. उमेश चापके, सहयाेगी प्राध्यापक