चार आंतरराष्ट्रीय शाळांच्या मुख्याध्यापकांना राज्यपालांकडून प्रमाणपत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:04 PM2019-08-14T12:04:51+5:302019-08-14T12:05:00+5:30
शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्यावतीने अस्थायी संलग्नता प्रमाणपत्रांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
अकोला: जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय शाळेतील चार मुख्याध्यापक व संबंधित गटशिक्षणाधिकारी यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषद अकोला अंतर्गत जि. प. शाळा वाडेगाव मुले पं.स. बाळापूर, जि. प. शाळा सिंदखेड पं.स. बार्शीटाकळी, जि. प. शाळा दिग्रस बु. पं.स. पातूर, जि. प. शाळा बोर्डी पं.स. अकोट या शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्यावतीने अस्थायी संलग्नता प्रमाणपत्र वितरण समारंभ सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल मुंबई, येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे संचालक सुनील मगर, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे विश्वस्त विजय भटकर, प्राची साठे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यंदा प्रथमच जिल्ह्यात चार शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे. या शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्यावतीने अस्थायी संलग्नता प्रमाणपत्रांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पातूरचे गटशिक्षणाधिकारी गौतम बडवे, बाळापूरचे गटशिक्षणाधिकारी समाधान जाधव, वाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक समाधान सोर, सिंदखेड येथील शाळेचे मुख्याध्यापक अरुण वानखडे, दिग्रस बु. येथील मुख्याध्यापक संजय बरडे, बोर्डी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे उपस्थित होते. या सर्वांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारले. (प्रतिनिधी)