कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश ‘सीईटी’साठी ८६ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:53 AM2019-01-30T11:53:29+5:302019-01-30T11:53:41+5:30
१ जानेवारीपासून कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश सीईटीसाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८६ हजार ४१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
अकोला: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, सामाजिक विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्र, जैवतंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान, पशुसंवर्धन आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन या दहा पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २0१९-२0 या शैक्षणिक वर्षापासून राज्य सामाईक परीक्षा (एमएच सीईटी) बंधनकारक केली आहे. १ जानेवारीपासून कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश सीईटीसाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८६ हजार ४१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
एमएच सीईटी परीक्षेसोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणारी आॅल इंडिया एन्ट्रन्स एक्झामिनेशन टेस्ट, जेईई, नीट, एआयईईए-यूजी यापैकी कोणतीही सामाईक प्रवेश प्रक्रिया ग्राह्य धरली जाणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये एमएच सीईटी, जेईई, नीट, एआयईईए-यूजी प्राप्त झालेल्या गुणांच्या ७0 टक्के गुण आणि पात्रता परीक्षेमध्ये (इयत्ता बारावी विज्ञान परीक्षेत प्राप्त एकूण गुणांच्या ३0 टक्के गुण तसेच प्रचलित पद्धतीनुसार इतर अधिभार यांच्या आधारावर उमेदवाराची गुणवत्ता निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणी व प्रवेश अर्ज पुष्टीकरण १ जानेवारी ते २३ मार्च २0१९ मुदत दिली आहे, तसेच आॅनलाइन नोंदणी व प्रवेश पुष्टीकरण ५00 रुपये अतिरिक्त विलंब शुल्कासाठी २६ मार्च ते ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. एमएच सीईटी परीक्षा दिल्याशिवाय विद्यार्थ्यांनी कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी आॅनलाइन नोंदणी करावी. (प्रतिनिधी)