चेन स्नॅचिंग प्रकरणातील सैनिकासह सहकाऱ्याची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:42 PM2018-12-05T12:42:41+5:302018-12-05T12:43:30+5:30
अकोला: शहरातील व शेगाव येथील चेन स्नॅचिंग प्रकरणात अटक केलेला सैनिक मंगेश इंदोरे व त्याचा सहकारी मिलिंद डाबेराव (रा. कोळासा) यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
अकोला: शहरातील व शेगाव येथील चेन स्नॅचिंग प्रकरणात अटक केलेला सैनिक मंगेश इंदोरे व त्याचा सहकारी मिलिंद डाबेराव (रा. कोळासा) यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. दोघाही आरोपींना इतर ठिकाणच्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलीस ताब्यात घेणार आहेत.
बाळापूर तालुक्यातील कोळासा येथील राहणारा मंगेश गजानन इंदोरे हा गत काही वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत आहे. तो सुटीवर गावी आला, की गावातील त्याचा सहकारी मित्र मिलिंद गजानन डाबेराव याच्या मदतीने शहरांमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे करायचा आणि पळून जायचा. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटले होते. त्यानंतर त्याने शेगाव येथेसुद्धा असे तीन गुन्हे केले होते. यासोबतच मूर्तिजापूर भागातही त्यांनी गुन्हे केलेले आहेत. २९ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मंगेश इंदोरे, मिलिंद डाबेराव यांना ताब्यात घेतले होते. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर त्यांना अटक केली होती. तीन डिसेंबरपर्यंत दोघेही पोलीस कोठडीत होते. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आणायचे असल्याने, पोलिसांनी त्यांना पुन्हा कारागृहातून अटक करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. (प्रतिनिधी)