अध्यक्ष पदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:49 AM2017-09-27T01:49:56+5:302017-09-27T01:51:09+5:30
अकोला: काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अकोल्यात दाखल झालेले पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी आमदार राजेश कुमार यांच्यावर पहिल्याच दिवशी स्थानिक पदाधिकार्यांमधील सवतासुभा पाहण्याची वेळ आली. महानगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झालीच पाहिजे, या मुद्यावरून काँग्रेसच्या बैठकीत प्रचंड घमासान रंगल्याचे चित्र समोर आले. शहरात काँग्रेस पक्षाचे अपरिमित नुकसान होत असल्याचा आरोप करीत पक्ष संघटनेसाठी सक्षम दावेदाराची निवड करण्याचा आग्रह पदाधिकार्यांनी लावून धरला.
लोकमत न्यूज नेटवर्क

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्षांची निवड प्रदेश स्तरावर न करता सदस्य नोंदणी करून लोकशाही पद्धतीने मतदानाच्या माध्यमातून निवड करण्यासाठी राहुल गांधी आग्रही आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच पक्षांतर्गत निवडणुकीसाठी काँग्रेसने सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण केली. मतदानासाठी १ हजार ८४१ सदस्य पात्र ठरले आहेत. ऑगस्ट महिन्यात निवडणूक प्रक्रियेद्वारे पक्षातील विविध पदांसाठी पदाधिकार्यांची निवड करणे अपेक्षित होते.
अखेर उशिरा का होईना, जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा आमदार राजेश कुमार मंगळवारी अकोल्यात दाखल झाले. स्वराज्य भवनमध्ये आयोजित बैठकीत निवड प्रक्रियेसंदर्भात स्थानिक पदाधिकार्यांनी मते व्यक्त केली. यावेळी काँग्रेसमधून पदाधिकार्यांची निवड करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आल्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत महानगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी पदाधिकार्यांनी लावून धरली. मागील दोन वर्षांच्या कालावधीत पक्षाचे वाटोळे झाल्याचा आरोप करीत विद्यमान महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांना कडाडून विरोध असल्याचे पदाधिकार्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. बैठकीला माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आ. नातिकोद्दीन खतीब, प्रदेश महासचिव मदन भरगड, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष सुषमा निचळ, स्वाती देशमुख, प्रकाश तायडे, राजेश भारती, हेमंत देशमुख, मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, राजेश पाटील, नगरसेविका शाहीन अंजुम खान, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, कपिल रावदेव, राजेश राऊत, विष्णू मेहरे, अनंतराव बगाडे, महेंद्रसिंग सलुजा, नितीन ताकवाले, महेश गणगणे, रवी शिंदे, विलास गोतमारे, अंशुमन देशमुख, चंद्रकांत सावजी, अजहर इक्बाल, सागर कावरे, आकाश कवडे, मनपा उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष खान सरदार खान आदी पदाधिकार्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.