तेल्हारा बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिव ‘एसीबी’च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 04:20 PM2023-09-25T16:20:43+5:302023-09-25T16:21:11+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची सभा सोमवारी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती.
तेल्हारा (जि. अकोला) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने कार्यवाही करून सभापती, उपसभापती व सचिव या तिघांना ताब्यात घेतल्याची घटना दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे बाजार समिती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची सभा सोमवारी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे सभेपूर्वी सभापती संदीप इंगळे, उपसभापती प्रदीप ढोले, सचिव सुरेश सोनोने हे बाजार समितीच्या कार्यालयामध्ये हजर होते. तक्रारकर्त्याने बाजार समितीमध्ये येऊन १ लाख रुपयांची लाच देत असतानाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक देत तिघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये तिघांना नेले होते. वृत्त लिहेपर्यत गुन्हा दाखल झाला नव्हता लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई सुरू होती.