...तर नववर्षात महाराष्ट्रात चक्का जाम : बालाजी शिंदे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:57 PM2018-11-18T12:57:35+5:302018-11-18T12:58:02+5:30
अकोला - देशातील १८ राज्यात परिट-धोबी समाज अनुसुचीत जातीत असून केवळ महाराष्ट्र शासनाच्या एका चुकीमूळे हा समाज गत अनेक ...
अकोला - देशातील १८ राज्यात परिट-धोबी समाज अनुसुचीत जातीत असून केवळ महाराष्ट्र शासनाच्या एका चुकीमूळे हा समाज गत अनेक वर्षांपासून अनुसुचीत जातीच्या लाभापासुन वंचीत राहत असल्याने डिसेंबर अखेरपर्यंत राज्य शासनाने या समाजाचा अनुसुचीत जातीत समावेश करण्याची शिफारस केंद्राकडे न पाठविल्यास नववर्षात महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अखील भारतीय परिट-धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी रविवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिला.
महाराष्ट्र शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमूख यांच्या कार्यकाळात भांडे समिती स्थापन करून परिट-धोबी समाजाचा अनुसुचीत जमातीत समावेश करण्यासाठी अभ्यास करण्यात आला. या समितीने तयार केलेल्या अहवालात धोबी समाज हा अस्पृश्य असल्याचे संपुर्ण निकष पुर्ण करीत असल्याने त्यांचा समावेश अनुसुचीत जातीत करण्याची शिफारस करण्यात आली, मात्र त्यानंतर पुन्हा हा मुद्दा प्रलंबीत ठेवण्यात आला. या कालावधीनंतर सद्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार असतांना त्यांनी २०१० मध्ये परिट-धोबी समाजाला अनुसुचीत जातीत समावेश करण्यासाठी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला, मात्र आता ते स्वता मुख्यमंत्री असतांनाही धोबी समाजाचा अनुसुचीत जातीत समावेश करण्यासाठीची शिफारस करीत नसल्याचे वास्तव आहे. त्यामूळे मराठा समाजाला ज्याप्रमाणे तातडीने १६ टक्के आरक्षण देण्याचे जाहिर केले आहे, त्याच तातडीने परिट-धोबी समाजाचा अनुसुचीत जातीत समावेश करण्यासाठी तातडीने शिफारस करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने ही शिफारस डिसेंबर २०१८ पर्यंत न केल्यास नववर्षात परिट-धोबी समाज बारा बलुतेदारांना सोबत घेउन राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी बालाजी शिंदे यांनी दिला. परिट-धोबी समाज संख्येने कमी असला तरी न्हावी, कुंभार, सुतार, लोहार यासह अल्पसंख्याकांना सोबत घेउन या शासनाविरोधात थंड थोपटणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही सरकार सत्तेत आणण्यास सक्षम नसलो तरी कोणत्याही पक्षाचे आमदार, खासदार यांच्याविरोधात मतदान करून त्यांचे संख्याबळ कमी करण्याची ताकद परिट-धोबी समाज व बारा बलुतेदारांमध्ये असल्याचे बालाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा परिट धोबी समाजाचे गोपी चाकर व पदाधिकारी उपस्थित होते.