अलिमचंदानी यांच्या निवडीस आव्हान!
By admin | Published: March 11, 2017 02:12 AM2017-03-11T02:12:23+5:302017-03-11T02:12:23+5:30
जात प्रमाणपत्रासंदर्भात आरोप; १७ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
अकोला, दि. १0- महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून विजयी झालेले भाजपचे नगरसेवक हरीश अलिमचंदानी यांच्या निवडीस न्यायालयात आव्हान दिले आहे. अलिमचंदानी यांनी अर्ज सादर करताना दाखल केलेले जात वैधता प्रमाणपत्र संशयास्पद असून त्यांनी ईव्हीएममध्येही घोळ घातल्याचा आरोप न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेत करण्यात आला आहे. यावरून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. डी. मिश्रा यांच्या न्यायालयाने अलिमचंदानी यांना १७ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग क्रमांक १२ ब हा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या प्रभाग क्रमांक १२ मधून हरीश अलिमचंदानी यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. अलिमचंदानी यांच्यासह सहा उमेदवार १२ ब मधून रिंगणात होते. यामधील भाजपचे उमेदवार हरीश अलिमचंदानी विजयी झाले तर अन्य पाच उमेदवारांचा पराभव झाला. यामधील मनोज साहू यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. डी. मिश्रा यांच्या न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून हरीश अलिमचंदानी यांचे जात वैधता प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. यावरून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. डी. मिश्रा यांच्या न्यायालयाने हरीष अलिमचंदानी यांना १७ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच न्यायालयाने अलिमचंदानी यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या प्रकरणी मनोज साहू यांच्या वतीने अँड. चंद्रकांत वानखडे कामकाज पाहत आहेत.