भाजपसमोर बालेकिल्ला, विरोधकांसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:56 PM2019-10-14T13:56:16+5:302019-10-14T13:56:25+5:30

भाजप समोर हा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे तर काँग्रेस समोर पक्षाचे अस्तित्वच टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

Challenge of survival: BJP and Opposition in Akola | भाजपसमोर बालेकिल्ला, विरोधकांसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान

भाजपसमोर बालेकिल्ला, विरोधकांसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान

Next

- आशिष गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला पश्चिम हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. तर या मतदार संघात काँग्रेस ला २५ वर्षांपासून यश मिळाले नाही. त्यामुळे यावेळी भाजप समोर हा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे तर काँग्रेस समोर पक्षाचे अस्तित्वच टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
भारतीय जनता पार्टीने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांना तब्बल सहाव्यांदा उमेदवारी बहाल केली आहे. तर काँग्रेसचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या साजिद खान पठाण निवडणूक रिंगणात दंड थोपटून उभे आहेत. दुसरीकडे काँग्रेसला ‘लक्ष्य’करणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा माजी महापौर मदन भरगड यांना गळाला लावत त्यांना वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले.
२०१४ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता या मतदारसंघातून भाजप-सेना युतीचेच उमेदवार म्हणूनच आ. गोवर्धन शर्मा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. या मतदारसंघात त्रिशंकू लढाई पाहावयास मिळणार असून, भाजप-शिवसेना महायुतीसमोर काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचा कितपत टिकाव लागतो, हे लवकरच दिसून येणार आहे.


युती ।मजबूत नेटवर्क, शिस्तबद्ध यंत्रणा
या मतदारसंघात भाजप व शिवसेनेचे नेटवर्क मजबूत मानल्या जाते. हिंदुत्वाच्या मुद्यावर लढविल्या जाणारी निवडणूक भाजपच्या पथ्यावर पडली आहे.
आघाडी । आघाडीमुळे मतविभाजन टळेल!
काँग्रेसचा परंपरागत मतदार काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यामुळे भाजपला कडवी टक्कर दिली जाऊ शकते.


वंचित । प्रयोगाची उत्सुकता
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व जातीसमूहातील घटकांना एकत्र आणण्याचा प्रयोग करीत उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्ग उमेदवाराच्या पाठीशी दिसून येतो.
 

Web Title: Challenge of survival: BJP and Opposition in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.