विकासकामांचा निधी खर्चाचे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 02:57 PM2020-01-21T14:57:22+5:302020-01-21T14:57:28+5:30
‘मार्च एन्डिंग’ला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने, या कालावधीत विकासकामांचा ११२ कोटी रुपयांचा निधी करण्याचे आव्हान यंत्रणांपुढे निर्माण झाले आहे.
- संतोष येलकर
अकोला : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर असला तरी, त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ४६ कोटी ९५ लाख ७१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने, या कालावधीत विकासकामांचा ११२ कोटी रुपयांचा निधी करण्याचे आव्हान यंत्रणांपुढे निर्माण झाले आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धन, नगरोत्थान, आरोग्य, शिक्षण, पाटबंधारे, महिला व बालकल्याण आदी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ९५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीपैकी यंत्रणांच्या मागणीनुसार ६० कोटी ८९ लाख ६४ हजार रुपयांचा निधी विकासकामांसाठी वितरित करण्यात आला. वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ४६ कोटी ९५ लाख ७१ हजार रुपयांचा निधी यंत्रणांमार्फत विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधीपैकी ११२ कोटी रुपयांचा निधी खर्च करणे आणि विकासकामे मार्गी लावण्याचे आव्हान जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे.
६३.६० कोटींचा निधी शासनाकडून केव्हा मिळणार?
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्ह्यातील विकासकामांसाठी चालू आर्थिक वर्षात १५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; मात्र मंजूर निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ९५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी (६० टक्के) शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाला प्राप्त झाला आहे. उर्वरित ६३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे प्रलंबित निधी शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.
९७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता!
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावानुसार ९७ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकासकामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत यंत्रणांच्या मागणीनुसार डिसेंबर अखेरपर्यंत ६० कोटी ८९ लाख ६४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, त्यापैकी ४६ कोटी ९५ लाख ७१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. विकासकामांचा मंजूर निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
- ज्ञानेश्वर आंबेकर
जिल्हा नियोजन अधिकारी