विकासकामे मार्गी लावण्याचे यंत्रणांपुढे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:18 AM2021-01-23T04:18:43+5:302021-01-23T04:18:43+5:30
संतोष येलकर अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी १६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध ...
संतोष येलकर
अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी १६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असला तरी, त्यापैकी २० जानेवारीपर्यंत केवळ २७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरल्याच्या पार्श्वभूमीवर उर्वरित १३७ कोटी ३ लाख रुपयांच्या निधीतून मार्च अखेरपर्यंत विकासकामे मार्गी लावण्याचे आव्हान यंत्रणांपुढे निर्माण झाले आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) अंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी १६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. शासनाकडून उपलब्ध असलेला निधी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रस्तावित कामांसाठी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा लागणार आहे. यंत्रणांच्या मागणीनुसार उपलब्ध निधीपैकी २० जानेवारीपर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयामार्फत ३३ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी वितरित करण्यात आला असून, त्यापैकी केवळ २७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. उपलब्ध निधीपैकी १३७ कोटी ३ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित असून, ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत (मार्च अखेरपर्यंत) उपलब्ध निधीतून विकासकामे मार्गी लावण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे.
आचारसंहितांच्या कालावधीत
विकासकामांना लागला ‘ब्रेक’!
कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती तसेच अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणूक आणि त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आचारसंहितेच्या कालावधीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विकासकामांना ‘ब्रेक’ लागला. त्यामुळे निधी खर्चावरही परिणाम झाला.
यंत्रणांकडून निधीची
मागणी रेंगाळली
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात प्रस्तावित विकासकामांसाठी संबंधित यंत्रणांकडून निधी मागणीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. मात्र संबंधित यंत्रणांकडून कामांची यादी, अंदाजपत्रके व निधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया रेंगाळली. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध निधीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
एकूण मंजूर निधी
१६५ कोटी रुपये
यंत्रणांना वितरित निधी
३३ कोटी ६९ लाख रुपये
विकासकामांवर आतापर्यंत झालेला खर्च
२७ कोटी ७० लाख रुपये
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात मंजूर १६५ कोटी रुपयांच्या निधीतून आतापर्यंत यंत्रणांच्या मागणीनुसार ३३ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. त्यापैकी २७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च करण्यात आला. उर्वरित निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
गिरीश शास्त्री
जिल्हा नियोजन अधिकारी