शाळांमध्ये दाखविणार पंतप्रधानांच्या जीवनावरील ‘चलो जीते है’ लघुपट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:23 PM2018-09-16T15:23:48+5:302018-09-16T15:26:21+5:30
पंतप्रधानांच्या जीवनावर ‘चलो जीते है’... हा लघुपट १८ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील सर्व शाळांमध्ये दाखविण्यात येणार आहे.
अकोला : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून आपल्याशी संवाद तर साधतातच. आता ते विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार आहेत, ते एका लघुपटाच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या जीवनावर ‘चलो जीते है’... हा लघुपट १८ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील सर्व शाळांमध्ये दाखविण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी शिक्षण विभागाला पत्र दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास, त्यांनी केलेला संघर्ष आणि चहावाला ते पंतप्रधान पदापर्यंत केलेला प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘चलो जीते है’... लघुपट बनविला आहे. या लघुपटातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, देशाच्या पंतप्रधानांची माहिती व्हावी, हा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जात आहे. ३0 मिनिटांचा असलेल्या या लघुपटाचे शाळांमध्ये लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अमरावती विभागातील सर्व शाळांमध्ये हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखविण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी शाळांमध्ये लॅपटॉप, डेस्कटॉप, संगणक, प्रोजेक्टर आणि स्क्रीन आणि साउंड सिस्टिमची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोठी यांच्या जीवनावर आधारित लघुपट शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्याबाबत अमरावती विभागीय आयुक्तांचे पत्र आले आहे. त्यानुसार तयारी सुरू आहे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.
माध्यमिक जि.प. अकोला.