विदर्भात दोन दिवस पावसाची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:03 PM2020-02-08T13:03:21+5:302020-02-08T13:03:26+5:30
एक-दोन ठिकाणी गडगडाटासह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.
अकोला: विदर्भात दोन दिवस आणखी ढगाळ वातावरण व काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला येथेही तुरळक भागात पावसाचा अंदाज कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर मध्य महाराष्ट्र अंतर्गत कर्नाटक या भागात ९०० मीटर उंचीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून वारे पूर्वेकडे वाहत आहेत तर हवेच्या खालच्या थरात पश्चिमेकडून वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या संगमामुळे शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी विदर्भात आणि छत्तीसगडमध्ये विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच एक-दोन ठिकाणी गडगडाटासह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.
सदरचा पाऊस हा पूर्व विदर्भात पडण्याची शक्यता जास्त आहे; परंतु पश्चिम विदर्भातसुद्धा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच दोन दिवसांनंतर थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.