नवीन चेह-यांमध्ये लढत होण्याची शक्यता !
By admin | Published: September 22, 2014 01:20 AM2014-09-22T01:20:44+5:302014-09-22T01:28:48+5:30
अकोला पश्चिम मतदारसंघात कॉँग्रेस, भाजपकडून चाचपणी.
अकोला: जात, धर्माच्या आधारे मतदान होणार्या आणि मुलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात कॉँग्रेस आणि भाजपकडून यावेळी नवीन चेहरा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात मुख्य लढत दोन नवीन चेहर्यांमध्ये होण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघातील लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत मूलभूत सुविधा, विकासाच्या मुद्याला बगल दिली जाते. गत दीड दशांकापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात हिंदू, मुस्लीम तसेच दलित मतदारांचे कमी जास्त प्रमाणात प्राबल्य आहे. विकासाच्या मुद्यावर या मतदारसंघात भाजपबाबत उघड-उघड नाराजी आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपने मतदारसंघनिहाय सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये अकोला पश्चिमचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. तसेच आमदार शर्मा हे निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते आहे. परिणामस्वरुप दुसर्या फळीतील हरिष आलिमचंदानी, महानराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, अँड. मोतिसिंह मोहता यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली. पक्षश्रेष्ठींकडून हरिष आलिमचंदानी, यांच्या रुपात नवीन चेहर्याला संधी देण्याचा विचार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कॉँग्रेसमध्येही बदलाचे वारे वाहत आहेत. अल्पसंख्यांक मतांचे विभाजन टाळण्यासाठी पक्षातील एका गटाने डॉ. झिशान हुसेन यांचे नाव पुढे आहे. तसेच मराठा मतांवर डोळा ठेवून कॉँग्रेसमधील गट विजय देशमुख यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होत आहे. एकूणच कॉँग्रेस आणि भाजप यावेळी नवीन चेहर्याला संधी देणार असल्याची शक्यता आहे.