ऑगस्टपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता धूसरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:45 AM2020-06-14T11:45:57+5:302020-06-14T11:46:06+5:30

माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे; परंतु याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

The chances of school starting by August are slim! | ऑगस्टपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता धूसरच!

ऑगस्टपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता धूसरच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज ३५ ते ४0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कंटेनमेन्ट झोनची संख्यासुद्धा वाढत आहे. जिल्हा रेड झोनमध्ये असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा आॅगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने डाएटला आॅनलाइन शिक्षणाबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे; परंतु याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नवीन शैक्षणिक वर्ष जून महिन्यातच सुरू करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत; परंतु शाळा-महाविद्यालये सुरू करायचे की नाहीत, याबाबत स्पष्ट निर्देश नाहीत. जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; परंतु अकोला जिल्ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जात आहे. दरररोज अकोल्यात ३५ ते ४0 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याचे चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्यास शिक्षण संस्थाचालकांनीसुद्धा असमर्थता दर्शविली आहे. दरवर्षी अकोला जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालय २६ जूनपासून सुरू होतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येते; मात्र यंदा कोरोना विषाणूने कहर केला असून, ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा विषाणू शिरला आहे.
कोरोना नियंत्रणात येत नसल्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याविषयी शिक्षण विभाग चाचपणी करीत आहेत.
कोरोनाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर आॅगस्ट महिन्याच्या अखेरही शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने डाएटच्या शिक्षण विभागाला आॅनलाइन शिक्षणाबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


शाळा सुरू करणे जिकिरीचे!
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीपासून ते मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरची व्यवस्था करणे ही बाब शाळांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे आॅगस्टअखेरही शाळा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे शिक्षण तज्ज्ञाकडून बोलले जात आहे.


६५ टक्के शाळांमध्ये इंटरनेट नाही!
शाळा बंद आहेत; पण शिक्षण सुरू आहे. असा उपक्रम शिक्षण विभागाने सुरू केला आहे. शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे आॅनलाइन शिक्षण द्यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत; परंतु जिल्ह्यातील ६५ टक्के शाळांमध्ये वीज कनेक्शनच नाही, तर इंटरनेट कुठून असणार? शहरातील शाळांमध्ये संगणक, इंटरनेट आहेत; परंतु ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणकही नाहीत आणि इंटरनेटही नाही. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणाची संकल्पना केवळ कागदावरच राहते.


शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे; परंतु अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाही. शासनाकडून निर्देश आल्यास विचार करता येईल. सध्या तरी शाळा उघडण्याबाबत अनिश्चितता आहे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

 

Web Title: The chances of school starting by August are slim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.