भाजपमध्ये उमेदवार बदलण्यासाठी शहकाटशह; विरोधी पक्ष सैरभैर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:12 AM2019-09-19T11:12:03+5:302019-09-19T11:12:50+5:30
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस
आशिष गावंडे,
अकोला: मागील पंचवीस वर्षांपासून अकोला पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्यावतीने विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा सलग विजयी होत आहेत. विकास कामांसाठी त्यांनी मागील पाच वर्षांत जवळपास निधी खेचून आणला असला तरी रस्त्यांची कामे अतिशय दर्जाहीन झाल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचा सूर आवळत खुद्द पक्षातील इच्छुकांकडूनच यंदा चेहरा बदलण्याची गरज असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. आ. गोवर्धन शर्मा यांचे पक्षातील वजन लक्षात घेता इच्छुक उमेदवारांकडून पडद्याआडून शहकाटशहचे राजकारण खेळल्या जात असल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस सैरभैर असल्याची परिस्थिती आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून १९९५ पासून ते २०१४ पर्यंत सलग पाच वेळा आ.शर्मा विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसली तरी भाजपाला मिळालेले मताधिक्य पाहता या मतदारसंघात भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचे लक्षात येते. दुसरीकडे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग पश्चिम मतदारसंघात दिसून येतो. यंदाची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे भाजप व शिवसेनेने अनेकदा स्पष्ट केल्यामुळे कार्यकर्त्यांची मने दुरावली होती; परंतु अचानक दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत युती जाहीर केली आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवून आणले. दुसरीकडे २०१४ मधील निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांनी ६६,९३४ मते मिळवित राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव देशमुख (२६,९८१ मते) यांचा पराभव केला होता. तसेच भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार आसीफ खान यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. १९९५ पासून या मतदारसंघात काँग्रेसला खाते उघडता आले नाही, हे येथे उल्लेखनीय.
विरोधी पक्ष विखुरले!
या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीचे विभाजन नेहमीच भाजपच्या पथ्यावर पडले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेससोबत आघाडी नसल्यामुळे भाजपसमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचा कितपत निभाव लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विरोधी पक्ष एकत्र आल्यास ही निवडणूक भाजपला डोईजड ठरण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये पडद्याआडून खेळी!
जिल्ह्यात धोत्रे गटाचा वरचष्मा असून, हा गट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खास मर्जीतील असल्याचे बोलल्या जाते. त्यामध्ये आ. गोवर्धन शर्मांचा समावेश असून, त्यांचे पक्षात मोठे वजन आहे. ‘लालाजींची इच्छा असेपर्यंत ते आमदार’ असे गमतीने बोलल्या जात असले तरी त्यात तथ्य आहे. त्यामुळे यंदा कसेही करून उमेदवार बदलण्यात यावा, अशी सुप्त इच्छा मनी बाळगून असलेले इच्छुक दावेदार उघडपणे फिल्डिंग न लावता पडद्याआडून खेळी करीत असल्याची माहिती आहे.