सत्तेच्या सहभागातही होणार बदल!
By Admin | Published: July 2, 2016 02:19 AM2016-07-02T02:19:08+5:302016-07-02T02:19:08+5:30
अकोला जिल्हा परिषदेच्या सभापती पदांसाठी १२ जुलैला निवडणूक.
संतोष येलकर /अकोला
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर चार सभापती पदांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय धुव्रीकरण झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या सहभागातही बदल होणार आहे.
गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सत्तेत भारिप-बहुजन महासंघासोबत काँग्रेसचा सहभाग होता. आरोग्य व अर्थ विभागाचे सभापती पद काँग्रेसकडे होते. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी घेण्यात आली. या निवडणुकीत सत्ताधारी भारिप-बमसंची साथ सोडून काँग्रेस पक्ष शिवसेना-भाजप व दोन अपक्ष मिळून तयार झालेल्या महाआघाडीसोबत राहिला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्मणराव अरबट आणि शिवसेनेच्या एक सदस्य माधुरी गावंडे या दोन सदस्यांनी भारिप-बमसंच्या उमेदवारांना मतदान केले. दोन्ही पदांवर विजय प्राप्त करीत भारिप-बमसंने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय ध्रुवीकरणामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेच्या सहभागातही बदल होणार आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य व अर्थ आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी १२ जुलै रोजी संपत आहे. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन चार सभापतींची निवड १२ जुलै रोजी करण्यात येणार आहे. सभापती पदांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सत्तेतील सहभागातही बदल होणार आहे. त्यामध्ये अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वपक्षाव्यतिरिक्त इतर दोन सदस्यांनी केलेल्या मतदानाच्या बदल्यात भारिप-बमसंकडून कोणाकोणाला सभापती पद दिले जाते, याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.