इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:51 PM2019-06-10T12:51:41+5:302019-06-10T12:57:55+5:30
यंदाच्या सत्रापासून इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलत आहे.
अकोला : मुलांना शिक्षण हे ओझे वाटू नये, हसत खेळत त्यांनी शिकावे, त्यांना शाळेची ओढ लागावी, अशी शासनाची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून आता प्राथमिक शिक्षणाचे अभ्यासक्रमही बदलत आहेत. यंदाच्या सत्रापासून इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलत आहे. यात चला मुलांनो, खेळत खेळत शिकू, असा बदल अभ्यासक्रमात घडवून आणला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत.
येत्या २६ जूनपासून शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी, मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यानुषंगाने यंदाच्या शैक्षणिक सत्रात काही नवीन प्रयोग करण्यात आले आहेत. त्याचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक सत्रात इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. बालभारती, गणित, माय इंग्लिश, खेळू, बोलू, शिकू आदी पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमात असणार आहेत. पाऊस फुले, फुलांचे संमेलन, मंगळवारची शाळा, मांजरांची दहीहंडी, मोरपिसारा, चित्रवाचन, खेळ खेळूया, नक्कल करूया, ओळख भाज्यांची आदी रंगीत चित्रांनी सजलेल्या पाठ्यक्रमांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी, तसेच अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकांच्या रचनेतही बदल करण्यात आले आहेत.