मधुमेह, क्षयरोग रुग्णांच्या आहारात बदल : रुग्णांसाठी नवीन वेळापत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:28 PM2019-05-11T14:28:46+5:302019-05-11T14:28:56+5:30
अकोला : शासकीय रुग्णालयात दाखल विविध रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये शासनाने तब्बल ३० वर्षांनंतर बदल केला आहे.
- प्रवीण खेते
अकोला : शासकीय रुग्णालयात दाखल विविध रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये शासनाने तब्बल ३० वर्षांनंतर बदल केला आहे. यापूर्वी १९९६ च्या शासन निर्णयानुसार रुग्णांना आहार दिला जात होता. यात राज्याच्या आरोग्य विभागाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नियमावलीनुसार आवश्यक बदल केले असून, यापुढे नव्या नियमानुसारच रुग्णांना आहार दिला जाणार आहे.
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे हृदयविकार, मूत्रपिंड, यकृत, टीबी, उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यात मोठ्यांसह लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे या रुग्णांना सरकारी रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत; पण औषधोपचारासह पौष्टिक आहारही मिळावा, यासाठी रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाºया आहारात बदल करण्यात आला आहे. राज्य शासनातर्फे तब्बल ३० वर्षांनंतर रुग्णांना देण्यात येणाºया आहारामध्ये बदल केले. त्यानुसार मधुमेह, क्षयरोगाचे रुग्ण, रुग्णालयातील आंतररुग्ण आणि मनोरुग्णालयातील रुग्ण यांच्या आहारात बदल करण्यात आलेला आहे. नवीन नियमावलीनुसार बालरुग्ण, मधुमेह, क्षयरुग्ण, प्रौढ रुग्ण आणि मनोरुग्णालयातील रुग्ण यांना रोज कोणता आहार द्यायचा, या आहाराचे प्रमाण किती असावे, दिवसात कोणत्या वेळी चहा, नास्ता द्यायचा, कोणत्या वेळी जेवण द्यायचे, याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले. यापुढे नवीन वेळापत्रकानुसार रुग्णांना आहार देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिली आहे.
‘आयसीएमआर’ मानकानुसार बदल
आरोग्य विभागाची जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, क्षय रुग्णालये आणि मनोरुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होणाºया रुग्णांच्या आहारात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मानकानुसार हे बदल करण्यात आले आहेत.
या रुग्णांच्याही आहाराचे प्रमाण निश्चित
मधुमेह, क्षयरोग रुग्णांव्यतिरिक्त दवाखान्यातील बालरुग्ण, शस्त्रक्रिया झालेले बालरुग्ण, कॅन्सर रुग्ण, जळीत रुग्ण, मनोरुग्ण, मधुमेह आणि हृदयविकाराचे रुग्ण, पोषण पुनर्वसन केंद्रातील बालके यांच्या आहाराचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
गर्भवतींसाठी मांसाहार
नवीन नियमावलीनुसार गर्भवतींसह वृद्ध रुग्ण आणि बालरुग्णांना दुपारच्या जेवणात डाळीऐवजी मांसाहार दिला जाणार आहे. आतापर्यंत त्यांना केवळ अंडी दिली जात होती. आता अंडीऐवजी मांसाहार व मासे दिले जाणार आहेत. गंभीर आजार असणाºया रुग्णांना आहारातून पौष्टिक घटक कसे मिळतील, याकडेही अधिक लक्ष दिले जाणार आहे.
रुग्णांच्या आहारात तब्बल तीस वर्षांनी बदल
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना उत्कृष्ट दर्जाचा आहार मिळावा, या अनुषंगाने आयसीएमआरच्या शिफारशीनुसार सुधारणा केली आहे. त्यानुसार रुग्णांना उत्कृष्ट दर्जाचा आहार दिला जाणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.