जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत बदल
By admin | Published: August 11, 2015 10:17 PM2015-08-11T22:17:08+5:302015-08-11T22:17:08+5:30
कॅरम, रग्बी, क्रिकेट खेळांमध्ये नवीन वयोगटांचा समावेश; कुडो व जम्परोप राष्ट्रीय स्पर्धेतून बाद.
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेअंतर्गत सन २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत बदल करण्यात आले आहे. भारतीय खेळ प्राधिकरणाच्या नियामान्वये ७ ऑगस्ट रोजी क्रीडा संचालनालय येथे झालेल्या सभेत हे बदल करण्यात आले असून, या संदर्भात सोमवार १0 ऑगस्ट रोजी पत्राद्वारे कळविण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी सांगितले. यंदाच्या स्पर्धांमध्ये कॅरम, सॉफ्टटेनिस, रग्बी, टेनिस व्हॉलीबॉल, क्रिकेट या खेळांमध्ये नवीन वयोगट समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच कुडो व जम्परोप या खेळाच्या स्पर्धा राज्यस्तरापर्यंत होतील; मात्र राष्ट्रीय पातळीवर दोन्ही खेळ वगळण्यात आले आहेत. कॅरम क्रीडा स्पर्धेत १९ वर्ष वयोगटासह १४ व १७ वर्ष मुले व मुली नव्याने पुन्हा समाविष्ट करण्यात आला. सॉफ्टटेनिसमध्ये १९ सह १७ वर्ष वयोगट मुले व मुली, कराटेमध्ये १७ व १९ वर्ष वयोगटासह आता १४ वर्ष वयोगट मुले व मुलींच्या गटात स्पर्धा होतील. रग्बी व रस्सीखेचमध्ये १९ सह १७ वर्ष वयोगट मुले व मुली गटात स्पर्धा घेण्यात येतील. क्रिकेटमध्ये आता मुलींनासुद्धा सहभागी होता येईल. १७ वर्षाआतील मुली हा गट नव्याने शालेय क्रिकेट स्पर्धेत टाकण्यात आला. याशिवाय कुस्तीमध्ये ग्रीको रोमन हा प्रकार १७ व १९ वर्ष वयोगटात समाविष्ट करण्यात आला.