वातावरणात बदल: सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:22 PM2018-11-12T12:22:28+5:302018-11-12T12:22:32+5:30
अकोला : वातावरणात अचानक झालेले बदल, तापमानात झालेली घट व रात्री थंडी वाढल्याने गेल्या काही दिवसांत सर्दी, ताप-खोकला तसेच विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत असून, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे.
अकोला : वातावरणात अचानक झालेले बदल, तापमानात झालेली घट व रात्री थंडी वाढल्याने गेल्या काही दिवसांत सर्दी, ताप-खोकला तसेच विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत असून, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे.
एकीएकडे सर्दी, कफ व खोकल्याने रुग्ण बेजार झाले आहेत. दुसरीकडे अनेक रुग्ण तापाने ग्रस्त आहेत. सर्वोपचार रुग्णालयात शेकडो रुग्ण तपासणीसाठी दाखल होत असल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्येसुद्धा या आजाराचे शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. वेळेवर उपचार घेतला नाही, तर रुग्ण गंभीर होऊ शकतो. एकीकडे डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे विषाणूजन्य तापाचेसुद्धा रुग्ण आढळून येत असल्याने ताप अंगावर काढू नका, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. शिवाय, वैद्यकीय उपचार थातूरमातूर असल्याने परिस्थिती दाहक आहे.
‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा
वातावरणातील बदलाने सर्दी, खोकला व विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढत असताना, गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील सर्वोपचार रुग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा अजूनही कायमच आहे. अनेक रुग्णांना चिठ्ठी लिहून देऊन बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात आहे.
अशी घ्यावी काळजी!
ज्यांना या आजाराची लक्षणे आहेत, त्यांनी थंड हवेपासून दूर राहावे, थंड कोल्ड्रिंक्स व शीतपेय टाळावे, ताप असेल, तर पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे तसेच डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार करणे गरजेचे आहे. सर्दी, खोकला व कफ असेल, तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळणी करणे आवश्यक ठरते.