दहावी परीक्षेच्या मूल्यमापन पद्धतीत बदल होणार, सूचना मागविल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:09 AM2019-07-14T11:09:31+5:302019-07-14T11:12:38+5:30
मूल्यमापन चाचणी आॅनलाइन असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
अकोला: इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने मूल्यमापन चाचणी सुरू केली आहे; परंतु या मूल्यमापन पद्धतीमध्ये काही बदल करायचे असल्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यभरातून पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक लिंक देण्यात आली असून, त्यावर सूचना बोलाविल्या आहेत.
दहावीतील विद्यार्थ्यांच्या निकालात वाढ व्हावी, त्यांची गुणवत्ता वाढावी या दृष्टिकोनातून दहावी परीक्षेपूर्वी शिक्षण विभागाकडून गतवर्षी मूल्यमापन चाचणी घेण्यात आली. शहरातील विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली. मूल्यमापन चाचणी आॅनलाइन असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. डोंगराळ व ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मूल्यमापन चाचणी घेताना, त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या मूल्यमापन पद्धतीमध्ये काही बदल करण्याचा विचार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सीबीएसई, आयसीएसई, आयबी या मंडळांच्या विषय योजना तसेच मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी २९ सदस्यांची समिती गठित केली आहे. या समितीने राज्यभरातून पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञ, संस्थाचालक, अभ्यासक्रम समिती सदस्यांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यासाठी एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत सूचना सादर करायच्या आहेत. असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक (समन्वय) विकास गरड यांनी कळविले.