वीज मीटरमध्ये फेरफार करणे ३०३ ग्राहकांना पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:50+5:302021-09-09T04:23:50+5:30
एप्रिल ते ऑगस्ट - २०२१ या कालावधीत महावितरणकडून जिल्ह्यातील अडीच हजार वीज ग्राहकांचे वीज मीटर तपासण्यात आले. यातील ३०३ ...
एप्रिल ते ऑगस्ट - २०२१ या कालावधीत महावितरणकडून जिल्ह्यातील अडीच हजार वीज ग्राहकांचे वीज मीटर तपासण्यात आले. यातील ३०३ वीज ग्राहकांनी वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आढळून आले. या वीज ग्राहकांनी महावितरणच्या ५ लाख ९१ हजार ७०४ युनिटची वीज चोरी केल्याचे तपासणीत आढळून आले. सोबतच ७ वीज ग्राहकांनी मंजूर जोडभारापेक्षा अधिक जोडभार वापरल्याच्या घटना आढळून आल्या. या वीज ग्राहकांना देखील दणका देत दीड लाख रुपयाची वसुली करण्यात आली आहे.
काय म्हणतो कायदा
वीज मीटरमध्ये फेरफार अथवा छेडखानी करणे हा विद्युत कायद्यानुसार गुन्हा असून या अंतर्गत संबंधित वीज ग्राहकावर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.तसेच अशा ग्राहकावर मीटर रीडिंगच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते. प्रति केडब्ल्यूएचपी नुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार रुपये,वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार रुपये,कृषी ग्राहकावर १ हजार रुपये तर इतर वर्गवारीतील ग्राहकावर २ हजार रुपये दंडात्मक कारवाई म्हणून आकारण्यात येते. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्या विरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.
अशी केली जाते चलाखी
वीज मीटरमध्ये फेरफार करून किंवा छेडखानी करून ग्राहक वीज बिल कमी करण्याचा प्रयत्न करतात.त्यासाठी मॅग्नेट किंवा चीप लावून मीटरची गती कमी करण्याचा प्रयत्न करतात. रिमोटच्या माध्यमातूनही असे प्रकार करण्यात आल्याचे यापूर्वी उघड झाले आहे.
वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर महावितरणची कडक नजर असून मीटरमध्ये फेरफार केल्यास मीटर जप्त करण्यात येतो. जबर दंडात्मक कारवाईही केली जाते आणि फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येतो.त्यामुळे ग्राहकांनी असे कोणतेही बेकायदेशीर कृत्य न करता वीज बिलांचा नियमित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.
पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, महावितरण, अकोला