बदलत्या वातावरणाचा आरोग्याला फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 03:23 PM2020-03-02T15:23:41+5:302020-03-02T15:23:46+5:30
आरोग्याला जपण्यासाठी नागरिकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
अकोला : दिवसा उकाडा, तर रात्री थंडी अशा दुहेरी वातावरणात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोलेकरांची डोकेदुखी वाढली आहे. सांधेदुखीसोबतच सर्दी, खोकला अन् तापीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्याला जपण्यासाठी नागरिकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
उन्हाळा लागला तरी, रात्रीच्या तापमानात घट होत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. अशातच अवकाळी पावसामुळे खोकला, अंगदुखी, घशाचा संसर्ग, ताप, डोकेदुखी आदींचा त्रास वाढला आहे. संसर्गजन्य आजारांसोबतच स्वाइन फ्लू होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फकटा लहान मुलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला होत असून, दमा तसेच श्वसन विकार असलेल्या रुग्णांचेही प्रमाण गत काही दिवसांपासून वाढले आहे. अॅलर्जी झाल्यानंतर ज्या प्रकारे शिंका येतात, नाक गळते त्याच प्रकारचा त्रास नागरिकांना होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उष्मा सुरू होतो, तेव्हा ताप येण्याचे प्रमाण वाढते. यासोबतच काही रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येत आहेत.
बालरुग्णांमध्ये वाढ
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना वातावरणातील बदलांचा सर्वाधिक फटका बसत आहे. सर्वोपचार रुग्णालयातील लहान मुलांचा वॉर्ड हाउसफुल्ल झाला आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी करा प्रतिबंधात्मक उपाययोजना
- सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
- खोकलताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करा.
- मास्कचा वापर करावा.
- हात वारंवार साबणाने धुवा.
- भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या.
वातावरणातील बदलांमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहार व नियमित व्यायाम केल्यास विविध आजारांपासून बचाव करता येईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.