नामसाम्य ट्रेड मार्कचा गैरवापर करणाऱ्या फर्मला चपराक
By admin | Published: July 6, 2017 01:26 AM2017-07-06T01:26:02+5:302017-07-06T01:26:02+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्देशाने जिल्हा न्यायालयाचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नामसाधर्म्य असलेल्या ट्रेडमार्कचा गैरवापर करून फापडा पावडर बाजारपेठेत विकणाऱ्या अकोल्यातील एका फर्मला न्यायालयाने जबर चपराक दिली आहे. ट्रेड मार्कचा यापुढे वापर करू नये, असे आदेश २० जून रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने दिले.
अकोल्यातील दाळ आणि बेसन राज्य आणि राज्याबाहेर सुप्रसिद्ध आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये १९९१ पासून न्यू दिनार ट्रेडिंगचे उद्योजक मोहम्मद युसूफ अ. गफ्फार यांचे फाफडा पावडर एका फर्मच्या नावाने नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे; मात्र गेल्या दोन वर्षांपासून के.टी. फूड प्रोडक्टचे संचालक रमेश लुल्ला नामसाधर्म्य असलेले ट्रेडमार्क वापरून फापडा पावडर बाजारपेठेत आणले. त्यामुळे बाजारपेठेतील मूळ ट्रेडमार्कवर विपरीत परिणाम झाला. उद्योजक मोहम्मद युसूफ यांनी लुल्ला यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र लुल्ला यांनी काहीही ऐकले नाही. त्यानंतर युसूफ यांंनी २० जून १६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली; मात्र त्याची दखलही कोणी घेतली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या युसूफ यांनी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. त्यावर न्यायालयाने युसूफ यांची याचिका दाखल करून घेऊन नामसाम्य ट्रेड वापरणाऱ्या लुल्ला यांना समन्स बजावून निकाल लागेपर्यंत फापडा पावडरचे उत्पादन करू नये, असे अंतरिम आदेश २३ जानेवारी १७ रोजी बजाविले. त्यानंतर लुल्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयाने एका महिन्याच्या आत लुल्ला यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे निर्देश ६ जून १७ रोजी जिल्हा न्यायालयास दिले. त्यानंतर २० जून १७ रोजी न्यायमूर्ती भालचंद्र यांच्या न्यायालयाने ट्रेंड मार्कचा गैरवापर केल्याचा ठपका लुल्ला यांच्यावर ठेवून नामसाम्य असलेल्या ट्रेड मार्कचा वापर करू नये, असे आदेश दिले. युसूफ यांच्याकडून अॅड जी.के. सारडा यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.