अमेरिकेत राहणार्या बुलडाण्याच्या चिमुकलीस भगवद्गीतेचा अध्याय मुखोद्गत
By admin | Published: April 13, 2017 06:07 PM2017-04-13T18:07:00+5:302017-04-13T18:07:00+5:30
अमेरिकेतील कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरा संतोष कायंदे या चिमुकलीने भगवद्गीतेचा १५ वा आध्याय मुखोद्गत सादर केला.
विदेशात राहुनही जोपासली संस्कृती : श्लोक, स्त्रोतांचेही पाठांतर
अकोला : संगणक, स्मार्ट फोनच्या काळात आजच्या तरुण पीढीला आपल्या संस्कृतीचा विसर पडत आहे. अमेरिकेत राहणार्या बुलडाणा जिल्हय़ातील दाम्पत्याने मात्र हा वारसा जपला असून, त्यांच्या साडेचार वर्षीय चिमुकलीस भगवतगीतेच्या अध्यायासह, श्लोक व स्त्रोत मुखोद्गत आहेत.
मराठी नववर्षानिमित्त अमेरिकेतील कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरा संतोष कायंदे या चिमुकलीने भगवद्गीतेचा १५ वा आध्याय मुखोद्गत सादर केला. स्वरा चे उच्चार अत्यंत स्पष्ट असून, परदेशात राहूनही आपली मूळ संस्कृती जोपासण्याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आशय साठे यांनी सांगितले. या आधीही अडीच वर्षांची असताना स्वराने पसायदान मुखोद्गत सादर केले होते. एवढय़ा लहान वयात असणारे तिचे स्पष्ट उच्चार आणि पाठांतर खरोखर कौतुकास्पद आहे. तिचे इतरही ोक आणि स्तोत्र पाठांतर कमालीचे आहे.
वारकरी घराण्याचा वारसा लाभलेली स्वरा ही मूळची बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा तालुक्यातील उंबरखेड या छोट्याशा गावची आहे. उंबरखेडचे आदर्श शेतकरी रंगनाथ कारभारी कायंदे यांची ती नात आहे. स्वराचे पणजोबा दगडवाडी येथील बाजीराव जायभाये यांचे आशीर्वाद स्वराला लाभल्याचे तीची आई अनुप्रिया केंद्रे-कायंदे यांनी सांगितले.
स्वरास हा वारसा तिची आई अनुप्रिया केंद्रे- कायंदे ह्यांच्या कडून मिळालेला असून, त्यांचेही वयाच्या ५ व्या वर्षी भगवद्गीतेचे ३ अध्याय मुखोद्गत होते. त्याची दखल १९९१ साली दूरदर्शन तसेच अनेक वर्तमान पत्रांनी घेतली होती. विश्वशांती केंद्र आळंदी आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती चे माजी समन्वयक स्व.अंगद भिकाजी केंद्रे हे स्वराचे आजोबा असून ते या मागचे प्रेरणास्थान आहेत.
आजच्या आधुनिक युगातही आपली मूळ संस्कृती जपण्याचे प्रोत्साहन यातून सर्वांना नक्कीच मिळू शकेल, अशी भावना व्यक्त होत आहे.